Breaking

Tuesday, 24 March 2026

आनंद क्षीरसागर यांना जिल्हास्तरीय आदर्श इंग्रजी शिक्षक पुरस्कार प्रदान

 


सांगोला/प्रतिनिधी : 




सांगोला तालुक्यातील हंगिरगे येथील कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद क्षीरसागर यांना यावर्षीचा प्रतिष्ठित सोलापूर जिल्हास्तरीय आदर्श इंग्रजी शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अक्कलकोट येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला. सोलापूर जिल्हा इंग्रजी अध्यापक मंडळ, पुणे येथील यश कल्याणी सेवाभावी संस्था आणि सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन मा. महेश इंगळे (मालक), यश कल्याणी संस्थेचे चेअरमन मा. डॉ. गणेश करे पाटील, प्रचिती फुंडे (हेल्थ व लाईफ कोच) यांच्या शुभहस्ते ट्रॉफी, मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन क्षीरसागर सरांना गौरविण्यात आले. क्षीरसागर सर गेल्या 32 वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीचा निकाल सातत्याने उत्कृष्ट लागत असून, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या दीर्घ शैक्षणिक सेवेची आणि सामाजिक कार्याची दखल घेऊनच हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती सांगोला तालुका इंग्रजी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष फिरोज आतार व सचिव बाळासाहेब नवत्रे यांनी दिली. यावेळी क्षीरसागर सरांचे कुटुंबीय, विद्यालयाचा कर्मचारी वर्ग तसेच सांगोला तालुका इंग्रजी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी आतार सर, नवत्रे सर, कांबळे सर, बदडे सर, माने सर, इंगवले सर, साळुंखे सर, कुंभार सर, लवटे सर, नकाते सर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.