59,806 रुपयांचा मुद्देमाल चोरी
सांगोला / प्रतिनीधी -
सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्र. 190/2026 अन्वये बीएनएस कलम 303(2) प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रशांत भिवाजी कोळी (वय 24, रा. सौंदणे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) हे क्रेडीट अॅक्सेस ग्रामीण लिमिटेड या मायक्रो फायनान्स कंपनीत नोकरीस आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवार (दि. 2) रोजी दुपारी सुमारे 12.45 वाजता मेडशिंगी ते सांगोला रोडवर, मेडशिंगी गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडला.
कोळी हे वसुलीची रक्कम घेऊन सांगोला येथील कार्यालयाकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीचे इंजिन अचानक बंद पडले. त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून बॅग टाकीवर ठेवली व इंजिन तपासण्यासाठी खाली वाकले. त्याच वेळी मेडशिंगीकडून आलेल्या मोटारसायकलवरील अज्ञात इसमाने संधी साधत टाकीवरील बॅग चोरून नेली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये 34,806 रुपये रोख रक्कम (500, 200, 100, 50, 20, 10 रुपयांच्या नोटा व नाणी) तसेच सुमारे 25,000 रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा जुना वापरातील टॅब असा एकूण 59,806 रुपयांचा ऐवज असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर सांगोला पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/वाकीटोळ करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली
