मंगळवेढा -
अनेक शेतकर्यांनी सोलर पंप बसविला असून तसेच अनेक शेतकरी प्रतीक्षेत आहेत अशा शेतकर्यांना सोलर पंपा सोबत सबसिडीवर सिंगल फेज कंट्रोलर द्या अशी मागणी कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी मंगळवेढ्याचे आमदार समाधानदादा अवताडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पडवळे यांनी निवेदनात सांगितले आहे की,महाराष्ट्र शासनाने ’मागेल त्याला सोलर पंप योजना’ सुरू केल्यामुळे राज्यभरातील अनेक शेतकर्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. परंतु राज्यभरात अनेक शेतकर्यांच्या शेतात विद्युत लाईट नसल्यामुळे ज्या ठिकाणी सोलर पंप शेतकर्यांनी शासनाच्या योजनेतून बसविले आहेत. अशा लहान शेतकर्यांच्या कडे फळबागा व भाजीपाला पिके घेतली जातात व त्यासोबत दुग्ध व्यवसाय ही केला जातो. सदर पिकावर रोग कीड येऊ नये म्हणून शेतकर्यांना कीटकनाशके व बुरशीनाशकांचे स्प्रे घ्यावे लागतात. स्प्रे साठी डढझ पंप चालविण्यासाठी सिंगल फेज मोटरचा वापर करावा लागतो. परंतु सोलर पंप धारक शेतकर्यांच्या कडे विद्युत लाईट कनेक्शन नसल्यामुळे त्यांना स्प्रे साठी एसटीपी पंप चालवता येत नाही. तसेच सदर शेतकर्याकडे दुग्ध व्यवसायासाठी संकरित गाईंचे दूध काढण्यासाठी ’दूध काढणी मशीन’ व चारा कटिंग साठी ’चाप कटर’ चा वापर करावा लागतो. यासाठीही सिंगल फेज मोटर गरजेची असते. त्यामुळे सोलर पंप धारक शेतकर्यांची असणारी अत्यंत महत्त्वाची अडचण सोडविण्यासाठी शेतकर्यांना सिंगल फेज कंट्रोलर द्यावा अशी मागणी पडोळे यांनी आमदार अवताडे यांच्याकडे केली.
पुढे निवेदनात पडवळे यांनी सांगितले आहे की, शेतकर्यांना सोलर पंपासोबत सौर पंपातील विद्युत(ऊउ) क्षमतेला (-उ) सिंगल फेज मोटर साठी अनुकूल करण्यासाठी पीव्ही कंट्रोलर किंवा इन्व्हर्टर सौर पॅनल मधून मिळणारी ऊउ वीज -उ मध्ये रूपांतर करतो, ज्यातून सिंगल फेज मोटर सुरू करता येते. कंट्रोलर किंवा इन्व्हर्टर ची क्षमता आणि प्रकार निवडताना आपल्या मोटरची आवश्यकता (उदा 1 एचपी, 2 एचपी) आणि सौर पॅनलच्या क्षमतेनुसार निवड करणे गरजेचे असते.वरील प्रमाणे सोलर पंप धारक शेतकर्यांची अडचण समजून घेऊन ज्या सोलर पंप धारक शेतकर्यांनी पंप बसविलेले आहेत व जे नवीन सोलर पंप बसविणार आहेत. त्या सर्व शेतकर्यांना सोलर पंपा सोबत सिंगल फेज कंट्रोलर/इन्व्हर्टर देण्यासाठी ऊर्जा मंत्र्याकडे पाठपुरावा करावा अशी विनंती पडवळे यांनी आमदार समाधानदादा आवताडे यांच्याकडे केली आहे.
आमदार समाधान आवताडे यांनी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोलर पंप धारक शेतकर्यांचा मुद्दा लक्षवेधी किंवा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सरकार पुढे विधानसभेत मांडू अशी ग्वाही दिली.
