परिसराला जोरदार गारपिटीने झोडपून काढले. कोळा ,नाझरे सर्कलमध्ये सुमारे दीड तास दगडासारख्या गारांचा पाऊस
सांगोला(तालुका प्रतिनिधी):
- सांगोला तालुक्यातील राजुरी, जुनोनी, कोळा, गौडवाडी आदी गावात निसर्गाचा मोठा कोप झाला असून परिसराला जोरदार गारपिटीने झोडपून काढले. कोळा ,नाझरे सर्कलमध्ये सुमारे दीड तास दगडासारख्या गारांचा पाऊस झाला. या भागातील आंबा, डाळिंब, गहू ,ज्वारी इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे काढणीला आलेला हंगाम डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाला आहे.याची तातडीने दखल घेत आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, तहसीलदार बाळूताई भागवत या अधिकार्यासह नुकसान ग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.शासनाने तातडीने पंचनामे करून भरघोस मदत करावी अशी मागणी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी शासनाकडे केली आहे. विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मदत लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आमदार बाबासाहेब देशमुख व सदस्य नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर जाऊन दौरा केल्याने जनतेतून शेतकरी वर्गाकडून कौतुक होत आहे.
गेल्या वर्षी शेतकर्यांनी डाळिंब, आंबा, गव्हाचे विक्रमी पीक घेतले आहे, मात्र यंदा गाराच्या पावसाने गाठल्याने उभी पिके आडवी झाली आहेत. गहू पीक डाळिंबाची झाडे भुई सपाट झाली. आंब्याचा मोहर गळून पडल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. गव्हाची प्रत खालावणार असल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक गणित कोलमडले आहे. नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेता महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना संबंधित अधिकार्यांना देण्यात आले.
पाहणीदरम्यान आमदार देशमुख म्हणाले की, पडलेल्या गारांचा आकार मोठा असल्याने द्राक्ष व डाळिंबाच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक बागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या आहेत. या भागात डाळिंब व द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणात असून, प्राथमिक अंदाजानुसार या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. डाळिंबासोबतच मका पिकालाही मोठा फटका बसला आहे.
जुनोनी चे पोपट तंडे यांचे तर आंब्याचे झाडावरचे आंबे खाली गळून पडले होते. अंकुश होनमाने यांच्या डाळिंबाच्या बागावर वेगवेगळ्या प्रकारचे डाग पडून डाळिंब खाली पडून डाळिंबाचे मोठे नुकसान झाले. दत्ता होनमाने यांच्याही डाळिंबाच्या बागेची नुकसान झाले. बापू देशमुख, दत्तू देशमुख, दत्ता माने यांचा गहू संपूर्ण भुई सपाट होऊन मोठे नुकसान झाले आहे असल्याचे दिसून आले.काढणीला आलेल्या ज्वारीवरही पाणी फिरल्याने जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. यावेळी कोळा जिल्हा परिषद गटाचे सदस्य किरण भाऊ पांढरे,पंचायत समिती सदस्य अमृत पाटील, सोपान कोळेकर ,सरपंच राजू पाटील, पत्रकार जगदीश कुलकर्णी यांच्यासह नेतेमंडळी शेतकरी वर्ग पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार देशमुख यांनी घटनास्थळावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय (मामा) भरणे आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नुकसानीची माहिती दिली व तात्काळ मदतीची मागणी केली. शासनाकडून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, आगामी विधानसभेच्या अधिवेशनात हा प्रश्न मांडून शेतकर्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
