सांगोला प्रतिनिधी -
सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे सांगोला महाविद्यालय सांगोला येथे दि. 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून सांगोला तालुक्यातील पक्षी विविधतेबद्दल निसर्गप्रेमी मंडळीं व विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी प्रा. डॉ. विधीन कांबळे, व प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी सांगोला महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये वर्ष भरात आढळलेल्या 102 पक्ष्यांची सूची तयार केली आहे. ही पर्यावरणाचे ज्ञान घेऊन संवर्धन व समतोल राखणे कामी खूप महत्वाची बाब आहे असे मत सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. सुधीर गवळी यांनी मांडले. ते सांगोला महाविद्यालयामध्ये जागतिक चिमणी दिना निमित्त बर्ड्स ऑन कॅम्पस इंडेक्स च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे गवळी साहेब व माण- मुक्तरंगचे पत्रकार राजेंद्र यादव सर, दामाजी एक्सप्रेसचे पत्रकार दिलीप घुले, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सदर सुची फलकाचे उद्घाटन करण्यात आले. या सूचीमध्ये सांगोला महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये वर्षभरात तिन्ही ऋतूंमध्ये आढळणारे विविध स्थानिक व स्थलांतरित प्रवासी पक्ष्यांची मराठी नावांसहित सूची तयार करण्यात आली आहे. ही सूची फलक स्वरूपात महाविद्यालयाच्या परिसरात लावून प्रकाशित करण्यात आली. प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे व प्रा. डॉ. विधीन कांबळे यांच्या प्रयत्नामुळे प्राध्यापक व विद्यार्थी यांना सांगोला महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये आढळणार्या पक्ष्यांच्या प्रजातींची माहिती करून घेता येईल. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
