बुद्ध विहार उभारण्याचा प्रस्ताव तयार करून त्वरित शासनाची मंजुरी मिळावी; उपोषणकर्ते भूमिकेवर ठाम
पंढरपूर/प्रतिनिधी -
पंढरपूर येथील यमाई तलावानजिक असणार्या नगरपरिषदेच्या जागेवर बुध्द विहार उभारण्याची बुद्धभूमी निर्माण कृती समितीची मागणी आहे. गेली चौदा वर्षापूर्वी सर्व सामाजिक संघटनांच्या मागणी नुसार पंढरपूर नगरपरिषदेने ठराव करून तसेच समितीकडून वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाची संशयास्पद भूमिका असल्याने न्याय मिळत नसल्याने महाड चवदार तळे मुक्तिसंग्रामच्या 99 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुद्धविहार उभारण्याच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी त्वरित मिळावी या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर बुद्धभूमी निर्माण कृती समितीचे संस्थापक सिद्धार्थ जाधव, कार्याध्यक्ष दिपक चंदनशिवे, सचिव स्वप्निल गायकवाड, उपाध्यक्ष योगेश जाधव, उपाध्यक्ष महेश मोटे, जनसंपर्कप्रमुख अमित कसबे यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
नगरपरिषदेने लोकशाही मार्गाने केलेल्या ठरावाच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून त्वरित शासनाची मंजुरी मिळावी अन्यथा आमरण उपोषण आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांकडून देण्यात आला.
यावेळी सुनिल सर्वगोड, आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, संतोष सर्वगोड, प्रशांत लोंढे, रवींद्र शेवडे, अमर फडतरे, दीपक साबळे, रुपेश वाघमारे, अर्जुन माने, एडवोकेट गौतम भालेराव, समाधान लोखंडे, राहुल सर्वगोड उपस्थित होते.
पंढरपुरात यमाई तलावा नजिक पंढरपूर नगरपरिषदेची दहा एकर जागा असून या जागेवर बुध्द विहार उभारणीची मागणी 2012 सालापासून विविध संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत होती. दरम्यान सदर जागा देण्या विषयीचा ठराव देखील पंढरपूर नगरपरिषदेने केला आहे. या ठिकाणी बोधी वृक्षाचे रोपण करण्यात आले असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पन्नास कोटी रूपये देण्याची घोषणा केली आहे. 2015 साली सदर जागेची मोजणी करून देखील अद्याप त्याचा नकाशा तयार करण्यात आला नाही. येथील लोकप्रतिनिधींकडून विधानसभेत दोनवेळा या विषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तरीही अधिकारी या विषयी दिशाभूल करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला असून सदर जागा देण्याबाबत गेल्या चौदा वर्षा पासून टोलवाटोलवी केली जात असल्याचा अनुभव आम्हाला येत असल्याची खंत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली.
तर दुसरीकडे 2024 साली श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या सर्व कर्मचार्यांच्या घरांसाठी सदर जागा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आमच्या बाबतीत उदासिनता तर मंदिर समितीच्या बाबत अधिकार्यांनी ऐवढी तत्परता का दाखवली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून सदर जागा बुध्द विहारासाठीच राखीव ठेवावी, मंदिर समिती कर्मचारी अथवा इतर कोणास राहण्यास देण्यास विरोध दर्शवण्यात आला असून त्वरित बुद्ध विहारासाठी दहा एकर जमिनीच्या मागणी नुसार परिपूर्ण प्रस्ताव तयार करून त्या प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
