सांगोला/प्रतिनिधी ः
महिला दिन म्हणजे स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा आणि समाजासाठी योगदान देणार्या महिलांना कृतज्ञतेने वंदन करण्याचा दिवस. याच भावनेतून यश नगर येथे दिनांक 11 मार्च 2026 रोजी महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि सन्मानपूर्वक आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका सौ. राणिताई माने, नगरसेविका छायाताई मेटकरी, नगरसेविका वैशाली सावंत आणि डॉ. जीवनमुक्ती डोंबे उपस्थित होत्या. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ज्येष्ठ महिलांच्या आयुष्यभराच्या कष्टांचा आणि समाजासाठी केलेल्या योगदानाचा गौरव करत त्यांचा सन्मान केला.
कार्यक्रमात राणिताई माने आणि छायाताई मेटकरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजाच्या घडणीत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कुटुंब सांभाळताना आणि समाजाला योग्य दिशा देताना महिलांनी केलेले त्याग आणि परिश्रम हे खरोखरच प्रेरणादायी आहेत. त्यांच्या अनुभवातून पुढील पिढीला मार्गदर्शन मिळते.
या उपक्रमात एकूण 25 ज्येष्ठ महिलांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानित महिलांच्या चेहर्यावर दिसणारा आनंद आणि अभिमान हा कार्यक्रमाचा खरा यशस्वी क्षण ठरला.
हा सुंदर उपक्रम नगरसेविका वैशालीताई सावंत व माजी नगरसेवक आणि पत्रकार सतिशभाऊ सावंत यांच्या संकल्पनेतून साकार झाला. त्यांच्या पुढाकारामुळे समाजात महिलांचा सन्मान करण्याची एक सकारात्मक परंपरा निर्माण होत आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. राजेश्वरी महिमकर आणि यश नगर सखी ग्रुप यांनी केले. त्यांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि यशस्वीरीत्या पार पडला.
महिलांच्या कर्तृत्वाचा आणि त्यागाचा गौरव करणारा हा उपक्रम समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला. अशा उपक्रमांमुळे महिलांबद्दलचा आदर अधिक दृढ होतो आणि समाजात सकारात्मक बदल घडण्यास मदत होते.
