Breaking

Tuesday, 10 March 2026

सांगोला तालुक्यात धक्कादायक घटना कर्ज व शेती विक्रीच्या वादातून मुलानेच केला वडिलांचा खून; लोखंडी पाईपने हल्ला

 

सांगोला/प्रतिनीधी 



सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे (पाटील वस्ती) येथे कर्ज व शेती विक्रीच्या वादातून मुलानेच आपल्या वडिलांचा लोखंडी पाईपने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सांगोला पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत रमेश बटू कुंभार (वय 55, रा. पाटील वस्ती, वाकी शिवणे, ता. सांगोला) हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी समाबाई कुंभार, मुलगा अतुल कुंभार व मोठा मुलगा चैतन्य कुंभार असा परिवार आहे. मोठा मुलगा चैतन्य कुंभार हा उच्चशिक्षित असून पीएच.डी. पर्यंत शिक्षण घेऊन बिहार राज्यात शिक्षक म्हणून नोकरी करीत आहे. तो अधूनमधून गावी येत असून त्याने गावात सुमारे 15 ते 20 लाख रुपये खर्च करून घरही बांधले आहे. तसेच तो घरखर्चासाठी नियमित पैसेही पाठवत असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, मयत रमेश कुंभार यांनी त्यांच्या नावावर असलेली सुमारे चार एकर शेती विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यावर एचडीएफसी बँकेचे सुमारे 17 लाख रुपये व सोसायटीचे सुमारे 70 हजार रुपये असे कर्ज असल्याने शेती विकून कर्ज फेडण्याचा त्यांचा विचार होता. मात्र मुलगा अतुल कुंभार हा शेती विकण्यास विरोध करत होता. याच कारणावरून व त्याच्या लग्नाच्या विषयावरून वडील आणि मुलामध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेच्या दिवशी म्हणजे 9 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास कुटुंबीय जेवण करून घरात बसले होते. त्यावेळी वीज आल्याने शेतातील विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी रमेश कुंभार शेतात गेले होते. त्याचवेळी मुलगा अतुल कुंभार हा देखील शेतातील डाळिंब बागेत औषध फवारणीसाठी गेला होता.

साधारणपणे रात्री साडेदहाच्या सुमारास शेजारी राहणारे तुकाराम मोहिते यांनी समाबाई कुंभार यांना सांगितले की, तुमच्या शेतातून रमेश कुंभार ओरडल्याचा आवाज आला. यानंतर त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली. त्यानंतर गावकर्‍यांकडून समजले की रमेश कुंभार यांच्या डोक्यावर, तोंडावर व पायावर कोणत्यातरी हत्याराने वार करून त्यांचा खून करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून परिसरातील नागरिकांकडून चौकशी सुरू केली. दरम्यान पोलिसांनी मुलगा अतुल रमेश कुंभार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच वडिलांचा लोखंडी पाईपने मारहाण करून खून केल्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे.

यावेळी आई समाबाई कुंभार व इतर नातेवाईकांनी आरोपी अतुल याला विचारले असता त्याने वडिलांनी मोठे कर्ज केले आहे, चार एकर शेती विकायला काढली आहे, तसेच माझे लग्नही करत नाहीत, त्यामुळे रागाच्या भरात मी त्यांचा खून केला, असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी समाबाई रमेश कुंभार यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी अतुल रमेश कुंभार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सांगोला पोलिस करीत आहेत.

या घटनेमुळे वाकी शिवणे परिसरात भीतीचे व हळहळीचे वातावरण निर्माण झाले असून कुटुंबातील वादातून झालेल्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.