सांगोला प्रतिनिधी -
दहावीची परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांवर अचानक आग्या मोहोळाच्या मधमाशांनी प्राणघातक हल्ला केल्याने शेकडो विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज सोमवार (ता.9) रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास वाकी(ता.सांगोला) येथे घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सांगोला तालुक्यातील वाकी-शिवणे येथील विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र आहे.या परीक्षा केंद्रावर वाकी, खवासपूर,आचकदाणी,लक्ष्मीनगर,महूद येथील आदर्श इंद्रजीत विद्यालय आदी शाळांमधील सुमारे साडेतीनशे विद्यार्थी परीक्षा देत आहेत.आज दहावीचा भूमिती विषयाचा पेपर होता. पेपर दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी संपला. सुमारे सव्वा एक वाजता परीक्षा देऊन बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांवर अचानक आग्या मोहोळाच्या मधमाश्यांनी हल्ला चढविला.परीक्षा केंद्राच्या समोरून विजयनगर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.या महामार्गाच्या दुसर्या बाजूला असलेल्या इमारतीच्या आवारात एका झाडावरती हे आग्या मोहोळ होते. अचानक सुटलेल्या वार्यामुळे झाडाची फांदी वाकली आणि हे आग्या मोहोळ उठले. या ठिकाणापासून जवळच विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या चार चाकी गाड्या उभ्या होत्या. परीक्षा संपल्यानंतर काही विद्यार्थी गाडीत येऊन बसले होते तर काही विद्यार्थी अजून गाडीकडे येत होते. याचवेळी या आग्या मोहोळाच्या मधमाशांनी सर्वात प्रथम अस्लम मुलाणी या वाहन चालकावर जोरदार हल्ला केला.यानंतर या मधमाशांनी परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच महामार्गावरून जाणार्या-येणार्या प्रत्येकावर जोरदार हल्ला चढविला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला.विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. राष्ट्रीय महामार्गावरून चालत जाणारे आणि दुचाकीवरून जाणार्या व्यक्तींवर मधमाशांनी हल्ला चढविला.काही विद्यार्थ्यांना पुन्हा वर्गखोल्यामध्ये जाऊन लपून बसावे लागले. अशा विद्यार्थ्यांचा यामुळे बचाव झाला.मात्र उघड्या वाहनामध्ये घरी जाण्यासाठी बसलेले विद्यार्थी,शिक्षक, पालक अशा असंख्य व्यक्तींवर मधमाशांनी हल्ला केला.या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब महूद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.लक्ष्मीनगर माध्यमिक विद्यालयातील सुमारे 35 विद्यार्थी आणि शिक्षकांवर आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.तर आचकदाणी हायस्कूलच्या सुमारे 20 जखमी विद्यार्थ्यांनी येथील एक खाजगी रुग्णालयात उपचार घेतले.उपचारानंतर या सर्व विद्यार्थ्यांना सायंकाळी घरी सोडण्यात आले आहे.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र गोंधळ
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे विद्यार्थी सैरावैरा पळू लागले.परीक्षा केंद्र परिसरात आणि राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.या पळापळीमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य,परीक्षा प्रवेश पत्र अशा अनेक गोष्टी यामध्ये गहाळ झाल्या आहेत. काही विद्यार्थी पुन्हा पळत जाऊन वर्ग खोल्यांमध्ये बसल्यामुळे त्यांचा बचाव झाला.
जखमी अवस्थेतही विद्यार्थ्यांना घरापर्यंत सोडले
या हल्ल्यात सर्वात प्रथम अस्लम मुलाणी या वाहन चालकावर मधमाशांनी हल्ला केला. शेकडो मधमाशांनी चावा घेतल्यानंतरही मुलाणी यांनी विद्यार्थ्यांना महूद येथील आदर्श विद्यालया पर्यंत सोडले. त्यानंतर श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना महूद येथील आयसीयू मध्ये भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी दोन किलोमीटर पळालो
मधमाशांच्या अचानक हल्ल्यामुळे मी प्रचंड घाबरलो होतो. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी मी परीक्षा केंद्रापासून सुमारे दोन किलोमीटर पळत गेलो होतो, तरीही अनेक मधमाशांनी अंगावर विविध ठिकाणी चावा घेतला.-विवेक जावीर(विद्यार्थी,लक्ष्मीनगर विद्यालय)
विद्यार्थिनींना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले
मधमाशांनी हल्ला केला तेव्हा आचकदाणी हायस्कूलच्या विद्यार्थिनी वाहनात बसल्या होत्या.वाहनातच मधमाशा शिरल्याने प्रचंड गोंधळ माजला.मुलींना वाहनातून बाहेर घेऊन वर्गखोल्यांमध्ये सुरक्षित पोहचविण्यासाठी शिक्षक यु.एस.कारंडे यांनी बराच वेळ मधमाशांचा हल्ला सहन केला.
महूद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गोंधळ
अचानक मोठ्या संख्येने विद्यार्थी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्याने या केंद्राच्या मर्यादा उघड पडल्या.थोड्याच वेळात विद्यार्थ्यांचे पालकही या ठिकाणी आले.त्यांना इंजेक्शन व इतर साहित्य बाहेरून विकत आणायला सांगितल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला व वेळेवर उपचार झाले नसल्याची तक्रार केली.
