*महिला दिनाचा मुख्य उद्देश ’महिला सक्षमीकरण’ आणि ’स्त्री-पुरुष समानता’ हा होय*
संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर*
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त थोर महिला समाज सुधारक, स्त्रियांच्या शिक्षणासाठी लढा उभारणार्या सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता रमाबाई व माता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. केशव माने, संस्था सदस्य प्रा. डॉ. अशोकराव शिंदे, प्रा. दीपक खटकाळे, प्रा.जयंत जानकर, उपप्राचार्य प्रा. संतोष जाधव, उपमुख्याध्यापिका सौ.वैशाली घोडके मॅडम, पर्यवेक्षक श्री दशरथ जाधव सर, पर्यवेक्षक श्री तात्यासो इमडे सर , पर्यवेक्षक श्री माणिकराव देशमुख सर,यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे संस्था सचिव मा.विठ्ठलराव शिंदे सर यांच्या शुभहस्ते या शैक्षणिक संकुलातील सर्व महिलांना गुलाबाचे रोप देऊन आगळावेगळा सन्मान करण्यात आला.
प्रस्ताविकामध्ये प्रा चंद्रकांत इंगळे यांनी दरवर्षी आठ मार्च हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो, हा दिवस केवळ शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम नसून स्त्रीच्या अस्तित्वाचा, कर्तुत्वाचा आणि तिच्या संघर्षाचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. शिक्षण ही केवळ माहिती देण्याचे प्रक्रिया नाही, तर ती संस्काराची देवाण-घेवाण आहे. विद्यार्थ्यांना शिस्त व संस्कार देण्याचे काम महिला शिक्षिका अतिशय सक्षम पणे करतात व त्यांच्या भविष्याला आकार देतात, त्यामुळे महिला शिक्षकांचा यथोचित सत्कार व सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संस्थासचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर यांनी आपल्या मार्गदर्शन पर मनोगतामध्ये
जागतिक महिला दिन (8 मार्च) हा महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा सन्मान करणारा आणि लिंग समानतेसाठी आवाज उठवणारा विशेष दिवस आहे, असे सांगितले.महिला दिनाचा मुख्य उद्देश ’महिला सक्षमीकरण’ आणि ’स्त्री-पुरुष समानता’ हा आहे. दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा होणारा हा दिवस स्त्रियांचा त्याग, संघर्ष आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून देतो. 1911 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा झाला. स्त्रियांना योग्य हक्क, समान वेतन आणि सुरक्षित कामाच्या ठिकाणाची मागणी करण्यासाठी हा लढा सुरू झाला. पूर्वीच्या काळी स्त्रियांवर अनेक बंधने होती, पण सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाबद्दलच्या योगदानामुळे स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला व हळूहळू स्त्री शिक्षणामुळे महिला सक्षमीकरण होण्यास मदत झाली. याचाच भाग म्हणजे आजच्या काळातील स्त्रिया शिक्षण,अंतराळ, संरक्षण, राजकारण, क्रीडा, शेती व व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिला सक्षमीकरण (थेाशप एािेुशीाशपीं) म्हणजे केवळ नोकरी करणे नव्हे, तर त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे होय. खरी स्त्री शक्ती ओळखण्यासाठी केवळ 8 मार्चची वाट न पाहता, 365 दिवस त्यांचा आदर करणे गरजेचे आहे. जेव्हा स्त्री सुरक्षित आणि सक्षम असेल, तेव्हाच देश प्रगती करेल.
महिला दिन महिलांच्या हक्कांच्या संघर्षाचे प्रतीक आहे.
स्त्रियांना सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर समान अधिकार मिळणे आवश्यक आहे.
महिला सक्षमीकरणासाठी शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
*नारी तू नारायणी, स्त्रीशक्तीचा विजय असो!* असे सांगून महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य प्रा केशव माने यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व तेथून पुढे नारी शक्तीचा विकास सुरू झाला. आजच्या युगामध्ये महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत व आपला नावलौकिक अबाधित ठेवत आहेत. दैनंदिन जीवन जगत असताना महिलांचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देत असताना त्यांनी ज्याप्रमाणे रथाची दोन चाके व्यवस्थित असतील तरच रथ व्यवस्थितरित्या मार्गक्रमण होतो, असे सांगून महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.
महिलांमधून सौ गीता गुळमिरे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख- ज्युनिअर कॉलेज प्रा.सौ. इंदिरा येडगे, माध्यमिक विभाग सौ. स्मिता इंगोले मॅडम, न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दत्तात्रय देशमुख यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापिका सौ. वैशाली घोडके मॅडम यांनी मानले.
