Breaking

Saturday, 21 March 2026

सांगोल्यात मोठा आर्थिक घोटाळा उघड - पतसंस्थेतील सोन्याचा अपहार, 87 लाखांहून अधिक नुकसान

 

सांगोला / प्रतिनिधी :




सांगोला शहरातील श्री बसवेश्‍वर व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगोला येथे सोन्याच्या तारण कर्जप्रकरणात मोठा आर्थिक गैरप्रकार उघडकीस आला असून, तब्बल 87,44,715/- इतक्या किमतीचे सोने अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सहकारी संस्थांच्या कामकाजाबाबत पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

याप्रकरणी सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 247/2026 नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (इछड) कलम 316(2), 316(5), 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अमर कृष्णाथ लोखंडे (वय 45, व्यवसाय - व्यापार, रा. स्टेशन रोड, सांगोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रमेश विठ्ठल रणदिवे हा संस्थेत मागील 25 ते 30 वर्षांपासून कार्यरत होता. संचालक मंडळाने त्याच्यावर विश्‍वास ठेवून सचिवपदी नियुक्ती केली होती.

तसेच, त्याला पंढरपूर अर्बन को-ऑप बँक, सांगोला शाखेतील लॉकर क्रमांक 239 व 240 हाताळण्याचे अधिकार सन 2007 पासून देण्यात आले होते. या अधिकाराचा गैरवापर करून आरोपीने संस्थेतील सोने तारण कर्जदारांचा विश्‍वासघात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, संस्थेतील एकूण 44 सोने तारण कर्जदारांपैकी 40 कर्जदारांचे सोने संबंधित बँकेतील लॉकरमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र तपासणीदरम्यान हे सोने आढळून आले नाही. एकूण 734.850 ग्रॅम वजनाचे सोने गायब झाल्याचे समोर आले असून, हा अपहार आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे संबंधित पतसंस्थेला मोठा आर्थिक फटका बसला असून, संचालक मंडळाने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असून, प्रकरणाचा अहवाल न्यायालयात सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.

या घटनेमुळे सांगोला परिसरात खळबळ उडाली असून, सहकारी पतसंस्थांमधील आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेबाबत नागरिकांकडून गंभीर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.