Breaking

Saturday, 21 March 2026

मलिदा शिवाय दस्त नाही? - सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयावर गंभीर आरोप

 


सांगोला/प्रतिनिधी 

सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, मलिदा दिल्याशिवाय दस्त नोंदणी होत नाही असे गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या आरोपांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दस्त नोंदणी प्रक्रियेत काही ठराविक एजंटांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. थेट कार्यालयात अर्ज केल्यास कामात अडथळे निर्माण होतात, तर एजंटमार्फत काम केल्यास नोंदणी तात्काळ होते, अशी तक्रार अनेकांनी केली आहे. यामुळे कार्यालयातील पारदर्शकता आणि विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

काही नागरिकांनी असा आरोप केला आहे की, सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही किरकोळ कारणे दाखवून फाईल प्रलंबित ठेवली जाते. त्यानंतर अप्रत्यक्षपणे व्यवस्था करण्याचा दबाव टाकला जातो. परिणामी, सामान्य नागरिकांना वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, या प्रकरणात काही व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, ऑडिओ क्लिप्स आदी पुरावे उपलब्ध असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. हे पुरावे संबंधित यंत्रणेकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळे प्रकरण आणखी गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर संबंधित अधिकार्‍यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही पुढे येत आहे. उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होत असताना प्रशासनाने अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास व प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.