तालुकास्तरीय निविष्ठा तक्रार समितीने शेतकर्याच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन केला पंचनामा
अजनाळे सचिन धांडोरे;
अजनाळे (ता. सांगोला) येथील जवळपास 12 शेतकर्यांनी 7 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत नोनिओ सिडस कंपनीच्या ‘बॉबी’ वाणाची खरबूज रोपे श्री गणेश हायटेक नर्सरी (टेंभुर्णी, ता. माढा) आणि गणेश रोपवाटिका (अनकढाळ, ता. सांगोला) येथून खरेदी केली होती. भरघोस उत्पादनाच्या आश्वासनावर घेतलेली ही रोपे प्रत्यक्षात मात्र शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सुरुवातीपासूनच अडचणींचा पाऊस
लागवडीनंतर रोपे सुरुवातीला उगवली; मात्र वाढीच्या टप्प्यावर अनेक तांत्रिक अडचणी दिसू लागल्या. साधारण 50 ते 55 दिवसांनंतर फळधारणा सुरू होताच फळे पांढरी पडणे, चिरा जाणे, अपेक्षित जाळी न येणे, आकारमानात तफावत आणि बाजारपेठेतील निकृष्ट दर्जा अशा गंभीर त्रुटी मोठ्या प्रमाणावर आढळल्या. परिणामी पिकाचा दर्जा खालावला आणि विक्रीयोग्य उत्पादनात मोठी घट झाली.
कंपनी व नर्सरींकडून उडवा-उडवी
समस्या निदर्शनास आल्यानंतर शेतकर्यांनी संबंधित कंपनी व नर्सरींना वारंवार कळविले; परंतु ठोस उपाययोजना किंवा जबाबदारी स्वीकारण्याऐवजी टाळाटाळीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे संतप्त शेतकर्यांनी कृषी अधिकारी, सांगोला यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती .
तक्रारीची दखल घेत 27 फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय निविष्ठा तक्रार समितीने सर्व सदस्यांसह शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि पंचनामा नोंदविला. समिती, कृषी शास्त्रज्ञ व विद्यापीठाच्या तज्ज्ञांचा संयुक्त अहवाल आठ दिवसांत सादर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या अहवालावरून नुकसानाचे टक्केवारी ठरवून पुढील कारवाई होणार आहे.
या प्रकरणात बाधित शेतकरी सचिन लाडे, धर्मराज कोळवले, अमोल येलपले, निखिल येलपले, राहुल करमुडे, चंद्रकांत कोळवले, सुरेश कोळवले, मयूर पुजारी, सागर चौगुले, अमोल कोळवले, अरुण येलपले, सुदाम खांडेकर आदी शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अनेकांनी कर्ज काढून शेती केली असून आता परतफेडीचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
कठोर कारवाईची मागणी
शेतकरी वर्गाकडून तीव्र मागणी करण्यात येत आहे की, जर संबंधित कंपनी किंवा नर्सरी दोषी आढळल्या तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी. तसेच झालेल्या नुकसानीची पूर्ण भरपाई देण्यात यावी आणि भविष्यात अशा प्रकारे निकृष्ट दर्जाची रोपे विक्री करून शेतकर्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने कडक नियंत्रण व देखरेख यंत्रणा उभारावी.
अहवाल येईपर्यंत शेतकर्यांची नजर प्रशासनाच्या निर्णयाकडे लागली असून, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. फोटो
तालुकास्तरीय निविष्ठा तक्रार समितीने काल अजनाळे गावातील नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या थेट बांधावर जाऊन पाहणी करुन पंचनामा केला आहे. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे,तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, कृषी सहाय्यक विवेक पाटील , कृषी अधिकारी सुनिता सरगर,यांच्यासह नोनिओ सिडस कंपनीचे अधिकारी कर्मचारी श्री गणेश हायटेक नर्सरीचे व गणेश रोपवाटिका यांचे मालक व एजंट व शेतकरी वर्ग उपस्थित होते.
नोनिओ सिडस व गणेश हायटेक नर्सरी व गणेश रोपवाटिका यांनी शेतकर्यांची फसवणूक केली आहे त्यामुळे आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे संबंधित नर्सरीने व कंपनीने याची गंभीर दखल घेऊन शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
शेतकरी धर्मराज कोळवले अजनाळे
