13 शेळ्यांचा मृत्यू; 8 शेळ्या नेल्या पळवून; चार लाखांहून अधिक नुकसान
सांगोला :
कडलास येथील शेतकरी मुकुंद बाबासाहेब पाटील यांच्या शेतातील शेडवर शुक्रवार 13 फेब्रुवारीच्या रात्री वन्य लांडग्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात अनेक वर्षांपासून कष्टाने वाढवलेल्या 13 शेळ्यांचा बळी गेला, तर 4 मोठ्या व 4 लहान शेळ्या लांडग्यांनी पळवून नेल्या. लांडग्यांच्या हल्ल्यामुळे या शेतकर्याच्या कुटुंबाचा आधार हिरावला असून उज्वल भविष्याचं कष्टातून पाहिलेलं स्वप्नं भंगलं आहे.
शेळीपालन हेच उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या पाटील कुटुंबावर या घटनेमुळे मोठे संकट कोसळले आहे. वन्य पशूंच्या या हल्ल्यामुळे त्यांचे सुमारे 4 लाखांहून अधिक रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, एका रात्रीत त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरलं आहे.. सर्व शेळ्यांचा मृत्यू झाल्यामुळं शेतात आता केवळ मोकळं कुंपण उरलं आहे. हे भयाण वास्तव, मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या भवितव्याच्या चिंतेनेपाटील कुटुंबाच्या डोळ्यांत साठलेलं दुःख पाहून परिसरही हळहळून गेला.
या घटनेची माहिती मिळताच कृषी विभाग व वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. मात्र नुकसानाची भरपाई आणि भविष्यातील संरक्षणाबाबत शेतकर्यांच्या मनात अजूनही भीती व अनिश्चितता आहे.
वन्य पशूंच्या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरातील शेतकरी धास्तावले असून, पाटील कुटुंबाला तातडीने जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
