5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला निकाल
सांगोला/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाच्या पत्रानुसार या निवडणुकांची प्रक्रिया 16 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे.
या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ही मतदार यादी ग्राह्य धरण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 16 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकार्यांकडून निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत 16 ते 20 जानेवारी 2026 अशी असून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 18 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नामनिर्देशन अर्जांची छाननी 22 जानेवारी 2026 रोजी करण्यात येणार आहे.
उमेदवारी माघार घेण्याची मुदत 23, 24 व 27 जानेवारी 2026 अशी निश्चित करण्यात आली असून, 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.30 नंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितींसाठीचे मतदान 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत होणार असून, मतमोजणी 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. निवडून आलेल्या सदस्यांची नावे 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
