सांगोला । प्रतिनिधी
सांगोला नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे नितीन विठ्ठल इंगोले यांची बिनविरोध निवड झाली असून, नामनिर्देशित सदस्यपदी विजय वसंत इंगोले व तनुजा बाळासाहेब एरंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे नगरपरिषदेच्या कारभाराला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दि. 13 जानेवारी रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी आनंदाभाऊ माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेना पक्षातर्फे नितीन विठ्ठल इंगोले यांनी एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. नामनिर्देशन वैध ठरल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
याच सभेत नामनिर्देशित सदस्यपदासाठी पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार शिवसेना पक्षाकडून विजय वसंत इंगोले, तर सांगोला शहर विकास आघाडीकडून तनुजा बाळासाहेब एरंडे यांची नावे सुचविण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दोन्ही नामनिर्देशनपत्रे वैध ठरल्याने त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, सर्व नगरसेवकांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास राजकीय क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव, शहरातील नागरिक तसेच नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या नेतृत्वामुळे सांगोला शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
