Breaking

Tuesday, 13 January 2026

ज्येष्ठ विधीज्ञ, आधुनिक सांगोल्याचे शिल्पकार अ‍ॅड.पृथ्वीराजभाऊ चव्हाण अनंतात विलीन

 


सांगोल्याचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष, विकासपुरुष हरपला

*सांगोला*

आधुनिक सांगोला शहराचे शिल्पकार ज्येष्ठ विधीज्ञ, पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा शहराच्या विकासात मोलाची भूमिका बजावणारे, अ‍ॅड. पृथ्वीराज भीमराव ऊर्फ भाऊ चव्हाण यांचे वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगोल्याच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि कायदेविषयक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

अ‍ॅड. भाऊ चव्हाण हे शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांचे राजकीय गुरू, एकनिष्ठ तसेच कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनतेशी असलेली नाळ ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये होती. आमदार गणपतराव देशमुखांच्या सर्व निवडणुकांची धुरा अ‍ॅड.पृथ्वीराज चव्हाण यांनी सांभाळली होती. 

सन 1975 ते 1980 या कालावधीत ते सांगोला नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांच्या कार्यकाळात सांगोल्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली. वाड्यावस्त्यांवर शाळा, रोडलाईट, रस्ते, समाजमंदिरे ही अ‍ॅड.पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात सुरू केली. शहरातील सर्वच महापुरूषांचे पुतळे त्यांच्या काळात उभारण्यात आले. भुयारी गटारीची सुरूवातही त्यांच्या काळात झाली होती. विशेषतः सांगोला नगरपालिकेची पाडलेली भव्य इमारत त्यांच्या कार्यकाळात नव्याने बांधण्यात आली होती..ही त्यांची दूरदृष्टी आणि विकासाभिमुख धोरणांची साक्ष मानली जाते. त्यामुळेच त्यांना सांगोल्याचे विकासपुरुष म्हणून गौरवले जाते. 93 व्या वर्षी सुध्दा प्रचंड स्मरणशक्ती म्हणून त्यांना गौरविले जात होते. 

विधीज्ञ म्हणून त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे वकिली व्यवसाय केला. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले ज्ञान व अनुभव समाजासाठी खर्ची घातला. कायदा, समाजकार्य आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांचा सन्मानाने उल्लेख केला जात होता.

त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे, दोन भाऊ, भावजया, पुतणे असा मोठा परिवार आहे. 

त्यांच्या पार्थिवावर सांगोला येथील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते, वकील संघटनेचे सदस्य, नगरपालिकेचे माजी व विद्यमान पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तिसर्‍या दिवसाचा विधी उद्या गुरुवारी सकाळी 7ः30 वाजता सांगोला शहरातील वाढेगांव रोडवरील स्मशानभूमी येथे होणार असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. अ‍ॅड. भाऊ चव्हाण यांच्या निधनाने सांगोल्याने एक अभ्यासू विधीज्ञ, विकासाभिमुख लोकप्रतिनिधी आणि निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे. त्यांच्या कार्याचा ठसा सांगोल्याच्या इतिहासात कायम स्मरणात राहील.