*पीकपाणी वार्तापत्र/ डॉ.नाना हालंगडे*
रब्बी हंगाम सन 2025-26 साठी सांगोला तालुक्यात पेरणी अंतिम टप्प्यात आली असून,18 डिसेंबर अखेर एकूण रब्बी क्षेत्रापैकी 95.44 टक्के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी जाधव यांनी दिली आहे. तालुक्यातील एकूण 44 हजार 471 हेक्टर रब्बी क्षेत्रापैकी 42 हजार 444.80 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली असून, यंदा रब्बी पिकरचनेत मक्याचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे.
यावर्षी सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाले होते. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. तालुक्यात अद्यापही विविध ठिकाणी नदीच्या आसपास किंवा ज्या गावातून ओढा, नाले गेले आहेत अशा ठिकाणी जमिनीत ओलावा कायम आहे. त्यामुळे काही ठिकाणी येथील पीकही अद्याप काढले नसल्याचे दिसून येत आहे. अद्यापही जास्त ओलावा असल्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी झाली नाही. तरीही सांगोल्यात समाधानकारक 95 टक्के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. *रब्बी हंगामात मक्याचे निम्म्याहून अधिक क्षेत्रावर पेरणी*
तालुक्यात रब्बी हंगामात मका हे सर्वाधिक क्षेत्रावर घेतले जाणारे पीक ठरले आहे. तालुक्यात रब्बी मकेचे सरासरी 5 हजार 156 हेक्टर क्षेत्र आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार या हंगामात 22 हजार 694 हेक्टर क्षेत्रावर सुमारे 440.15 टक्के मक्याची पेरणी झाली असून, एकूण रब्बी पेरणी क्षेत्राच्या जवळपास निम्मे क्षेत्र मका पिकाखाली आहे. डाळिंबाचे क्षेत्र कमी झाल्यानंतर तालुक्यात जनावरांच्या चार्यासाठी शेतकर्यांचा कल मोठ्या प्रमाणावर मक्याकडे वाढल्याचे चित्र आहे. गेल्या पिकाची मका दर नसल्यामुळे शेतकर्यांकडे अद्यापही पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे *ज्वारी,गहू आदी तृणधान्यांची पेरणी*
तृणधान्य पिकांमध्ये मक्यानंतर रब्बी ज्वारी हे महत्त्वाचे पीक असून, ज्वारीचे सरासरी क्षेत्र 37 हजार 479 हेक्टर आहे. त्यापैकी 14 हेक्टर 144 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. गहू पिकाची पेरणी 822 हेक्टर क्षेत्रावर नोंदविण्यात आली आहे. इतर तृणधान्यांची पेरणी 440.15 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. एकूण तृणधान्यांची पेरणी 39 हजार 905 हेक्टर असून, तृणधान्य पेरणीची टक्केवारी 91.36 टक्के इतकी आहे. *कडधान्य व गळीतधान्य पिके*
कडधान्य पिकांमध्ये हरभरा हे प्रमुख पीक असून, सरासरी 768 हेक्टर क्षेत्रापैकी 315.89 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. इतर कडधान्यांची पेरणी 17 हेक्टर इतकी आहे. गळीतधान्य पिकांमध्ये भुईमूग 21.40 हेक्टर, तर करडई 92.40 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून, एकूण गळीतधान्य क्षेत्र 113.80 हेक्टर आहे. *ऊस, चारा पिके व भाजीपाला*
तालुक्यात ऊस पिकाखाली एकूण 2 हजार 31.60 हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये अडसाली ऊस 984.60 हेक्टर, पूर्व हंगामी ऊस 966 हेक्टर आणि खोडवा ऊस 81 हेक्टर क्षेत्रावर आहे. तालुक्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. जनावरांची विशेषत: जर्सी गाईंची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चारा पिकांकडे शेतकर्यांचा ओढा वाढला आहे. सध्या जनावरांसाठी चारा पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून, मका व ज्वारी मिळून 7 हजार 233 हेक्टर क्षेत्रावर चारा पिके घेतली आहेत.
भाजीपाला पिकांमध्ये कांदा (230 हेक्टर), मिरची (338 हेक्टर), टोमॅटो (167.20 हेक्टर), शेवगा (290 हेक्टर) यासह विविध भाजीपाला पिकांची लागवड झाली असून, एकूण भाजीपाला क्षेत्र 1 हजार 264.60 हेक्टर इतके आहे.
फळबाग पिकांमध्ये डाळिंब (494 हेक्टर) व केळी (412 हेक्टर) ही प्रमुख पिके ठरली आहेत. याशिवाय पेरू, आंबा, खरबूज, कलिंगड आदी फळपिकांची लागवड मिळून एकूण फळबाग क्षेत्र 1 हजार 354 हेक्टर आहे.
*कोट*_यावर्षी तालुक्यात चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे 95 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी झाली आहे. सध्याचे थंड हवामान 3 हजार हेक्टर क्षेत्रावरील गव्हाला लाभदायक ठरत आहे. पेरणी चांगली झाली असली तरी शेतकर्यांनी शिफारशीनुसार खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण व योग्य पाणी व्यवस्थापन केले पाहिजे. योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास यंदाचा रब्बी हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक ठरेल - *दिपाली जाधव,तालुका कृषी अधिकारी, सांगोला*
