Breaking

Thursday, 18 December 2025

सांगोला नगरपरिषद निवडणूक-2025 : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; 21 डिसेंबरला निकाल

 



सांगोला । प्रतिनिधी



सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 ची मतदान प्रक्रिया मंगळवार, दि. 02 डिसेंबर रोजी शांततेत आणि उत्साहात पार पडली. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह एकूण 21 सदस्य जागांसाठी तब्बल 77.70 टक्के मतदान झाले असून, लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार दि. 21 डिसेंबर रोजी पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असून, मतमोजणी प्रक्रियेसाठी 64 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या नियुक्त कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण दि. 18 डिसेंबर रोजी याच सभागृहात यशस्वीरीत्या पार पडले.

दरम्यान, प्रभाग क्रमांक 1अ व 11अ या जागांसाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशनपत्र शिल्लक राहिल्याने त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली नाही.

मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनामार्फत कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी प्रतिनिधींना ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, तसेच मतमोजणी स्थळी मोबाईल फोन आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

मतमोजणीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून, सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सैपन नदाफ यांनी दिली आहे. आता 21 डिसेंबर रोजी सांगोल्याच्या राजकीय चित्रावर शिक्कामोर्तब होणार असल्याने सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.