Breaking

Monday, 10 November 2025

सांगोला तालुक्यात दुर्दैवी घटना — पती-पत्नीने एकाच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या

सांगोला / प्रतिनिधी 

सांगोला तालुक्यातील हतीद गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, एका दांपत्याने घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतांची नावे वामन महादेव घाडगे (वय ६२) आणि अनिता वामन घाडगे (वय ५५) अशी असून, दोघेही हतीद (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मृतांचे मुलगा विकास वामन घाडगे (वय २५, व्यवसाय शेती व ड्रायव्हर) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दिली आहे.

ही घटना १० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारास १.३० वाजता घडली. सकाळी नेहमीप्रमाणे सर्वांनी चहा-पाणी उरकून आपापल्या कामांसाठी घराबाहेर पडले होते. विकास घाडगे ग्रामपंचायतीच्या कामासाठी गावात गेले होते, तर त्यांची पत्नी स्वाती चुलत भावाच्या घरी गेली होती. घरात फक्त वामन आणि अनिता घाडगे हे दोघेच होते.

दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास विकास घरी परतले असता स्वयंपाकघराचे दोन्ही दरवाजे आतून बंद असल्याचे लक्षात आले. शंका आल्याने त्यांनी सिमेंटच्या खिडकीतून आत डोकावले असता, दोघांनीही लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दृश्य पाहून ते हादरले.

आरडाओरड केल्यावर शेजारील नागरिक — शहाजी बाबासो घाडगे, नानासाहेब शिवाजी घाडगे, तानाजी तात्या घाडगे आदी लोक तातडीने घटनास्थळी धावून आले.

 कुटुंबातील दु:ख कारणीभूत?

विकास घाडगे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाऊ आकाश याचा काही काळापूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर दोघेही मानसिकदृष्ट्या खचले होते आणि त्यांचा स्वभाव चिडचिडा झाला होता. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिस तपास सुरू असून

या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद (रजिस्टर नं. २०७/२०२५, कलम १९४ बी.एन.एस.) सांगोला पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोसई पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे हतीद गावात शोककळा पसरली असून, गावकऱ्यांनी घाडगे कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.