Breaking

Wednesday, 26 November 2025

चोपडीत संपन्न झाला असाही एक गावदेव

 

*आदर्श घ्यावा असा धार्मिक सोहळा

सांगोला/प्रतिनिधी: 




 डॉल्बीचा तसेच इतर गोष्टींचा अनावश्यक खर्च टाळत चोपडीतील सहदेव विटेकर या पालकाने आपल्या मुलीचा गावदेव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करत गाव देवास येणारा 52 हजार रुपयाचा खर्च गावातील शाळेस कृतज्ञता निधी म्हणून बहाल केला. भारतीय संस्कृतीतील परंपरेची प्रतिष्ठा वाढवणारा मुलीचा गावदेव सोहळा सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला होता. 

          गावदेव म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशीचा महत्वाचा धार्मिक कार्यक्रम. यानिमित्ताने नवरा-नवरी आपापल्या गावातील मंदिरांना भेट देऊन देव-देवतांना आपल्या सुखी, आनंदी सहजीवनासाठी आर्जव करतात. आयुष्याच्या या महत्वाच्या टप्प्यावर उपवर मुलामुलींनी, कुटुंबीय, ग्रामस्थ, आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत मंदिरात जाऊन ग्रामदैवत, कुलदैवत आणि इतर दैवतांपुढे नतमस्तक होणं, कृतज्ञता व्यक्त करणे, आशीर्वाद घेणे हा अत्यंत भावनिक आणि धार्मिक कार्यक्रम.      

               अलीकडच्या काळात मात्र याच पवित्र धार्मिक कार्यक्रमामध्ये ओंगळवाणे, हिडीस प्रकार पाहायला मिळतात. डॉल्बीचा दणदणाट, त्यावर चालू असलेली कर्णकर्कश आवाजातली बेसुमार गाणी, त्या गाण्यावर विक्षिप्तपणे थिरकणारी तरुणाई. खर म्हणजे डॉल्बीच्या आवाजामुळे शरीरावर घातक परिणाम झाल्याच्या, कायमस्वरूपी बहिरेपणा आल्याच्या आणि काही घटनांमध्ये तर हृदयविराचा झटका येऊन जीवावर बेतल्याच्या कित्येक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यामुळे सरकारनेही 55 डेसिबल पेक्षा जास्त आवाजात ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यावर बंदी घातली आहे. तरीसुद्धा बेकायदेशीरपणे डॉल्बीचा वापर अशा कार्यक्रमात होताना दिसत आहे. 

                  चोपडीमध्ये  मुलीच्या गाव देव कार्यक्रमानिमित्त घडलेली सुंदर घटना सर्वांच्याच  मनात घर करून राहिली.. सुंदर पारंपरिक पेहरावात नटलेली नवरी करवल्या आणि कुटुंबियांसह गावदेवासाठी आली. अतिशय साध्या पद्धतीने हा गावदेव संपन्न झाला. कालच चोपडीची उच्चशिक्षित कन्या स्नेहल मिरजस्थित आकाशसोबत विवाहबद्ध झाली. लग्नाच्या दिवशी नवरदेवा सोबत पारना काढला जातो त्यासाठीही धार्मिक वृत्तीने एक वेगळा संस्कार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तो म्हणजे  कपाळावर गंध, गळ्यात टाळ घातलेले वारकरी वेशातील सुंदर बालवारकरी, सोबतीला मृदूंग आणि ओठावर ग्यानबा-तुकोबाचे गोड अभंग. सगळं वातावरणच बदलून गेल. हा सगळा जत्था टाळ मृदूंगाच्या गजरात अत्यंत धार्मिक, भारावलेल्या वातावरणात  मारुतीच्या मंदिराकडे नवरदेवाला नेण्यात आले. लग्नविधीसाठी आलेले सर्वजण हे विलोभनीय दृश्य शांतपणे पाहत होते आणि डोळ्यात साठवत होते.  किती सुंदर परंपरा, उत्कट भावनेने सुखी, समृद्ध सहजीवनासाठी देवाकडे मागितलेला आशीर्वाद. 

मुलीच्या लग्नानंतर तिचे गाव आणि देव दोन्ही बदलणार असतात. तिचे अवघे विश्‍वच बदलणार असते. अशावेळी गावदेवाच्या निमित्ताने कृतज्ञपणे माहेरच्या देव-देवीसमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेणे याला वेगळच महत्व आहे. 

          गावदेवाच्या निमित्ताने या कुटुंबाने साधेपणाने केलेली ही कृती आपल्या श्रीमंत परंपरांची जाणीव करून देणारी आहे. विशेष म्हणजे आजच्या काळात शाळा म्हणजे मंदिरेच आहेत हि भावना ठेऊन वधुपित्याने गाव देवास होणारा अनावश्यक खर्च टाळून घराशेजारील गणेशनगर जिल्हा परिषद शाळेला 21 हजार रुपयांचा तर गावातील बाळासाहेब देसाई विद्यालयाला 31 हजार रुपयांचा कृतज्ञता निधी दिला. 

        मुलीचं लग्न म्हणजे वधुपित्यासाठी अतिशय भावनिक विषय. वरून शांत दिसणारा बाप आतून मात्र पुरता हळवा झालेला असतो. माझ्या मुलीची पाठवणी वेगळी ठरावी, आपल्या मूळ परंपरा पुरुज्जीवीत करणारी असावी या उदात्त हेतूने एका पित्याने प्रत्यक्ष कृतीत उतरवलेला हा विचार, हि परंपरा पुढे जाणे आवश्यक आहे.

 बर्‍याच गावामध्ये डॉल्बीचा कर्कश आवाजाचा प्रकार वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे डॉल्बी या प्रकारची गावकर्यांनी धास्ती घेतली आहे. ध्वनिक्षेपकाचे थरावर थर, लावलेले वाहन गावात दिसले रे दिसले की ग्रामस्थ तातडीने काम उरकून आपआपल्या घराच्या दिशेने मार्गस्थ होतात. गावातील व्यावसायिक शटर डाऊन करायच्या तयारीला लागतात. काही वेळातच गावात शुकशुकाट जाणवतो. आणि प्रचंड कर्कश आवाजाचे डॉल्बी चालू राहतात. या वाईट गोष्टींना छेद देत विटेकर कुटुंबीयांनी आपल्या मुलीचा गावदेव अतिशय सुंदर पद्धतीने केला आहे.आपण कमावलेल्या पैशाचा ताल न करता वधूच्या पित्यांनीही या संस्कारी गोष्टींचा आदर्श घ्यायला हवा. डॉल्बीच्या  कीळसवाण्या प्रकाराला छेद द्यायला हवा....

इंजि. गणेश कृष्णा बाबर (सामाजिक कार्यकर्ते)