अॅट्रॉसिटी कायद्यान्वयेही आरोपीस शिक्षा; माळशिरस न्यायालयाचा निर्णय
सांगोला/ प्रतिनिधी :
सांगोला /प्रतिनिधी : मोटेवाडी (ता. माळशिरस) येथील लक्ष्मण विष्णू सरगर (वय 35) यास पीडित अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी माळशिरस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीस अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत देखील शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
सदर घटनेबाबत,दिनांक 30 जून 2018 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर म्हसवड चौक येथे घरी जाण्यासाठी उभी असताना आरोपी लक्ष्मण सरगर हा तेथे आला. मी तुला घरी सोडतो असे सांगत त्याने तिला आपल्या मोटरसायकलवर बसवले. मात्र घरी जाण्याऐवजी तो मोटरसायकलने फॉरेस्ट ऑफिसजवळील कच्च्या रस्त्याने घेऊन गेला आणि उसाच्या शेतात नेले.त्याठिकाणी आरोपीने मुलीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडित मुलगी आरडाओरड करू लागल्यावर आरोपीने तिला दमदाटी केली. मात्र मुलीने चतुराईने स्वतःची सुटका करून घेतली आणि जवळच असलेल्या शिंदे यांच्या घरी जाऊन मदत मागितली. शिंदे यांच्या फोनवरून तिने वडिलांना घटनेची माहिती दिली. नंतर वडिलांसह घरी परतल्यावर तिने सर्व घटनाक्रम सांगितला.तपास व न्यायालयीन प्रक्रिया ,या प्रकरणी माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 214/2018 भादंवि कलम 354(अ)(ब), 506 तसेच अँट्रॉसिटी कायदा कलम 3(1)(डब्ल्यू)(ळळ), 3(2)(व्हीए) आणि पोक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आला. तपास तत्कालीन पोलीस उपअधीक्षक निखिल पिंगळे यांनी केला, तर उर्वरित तपास पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पूर्ण केला.
सरकार पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यामध्ये पीडित मुलगी, तिची आई-वडील यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. तसेच तपासकामी मिळालेल्या सीडीआर रेकॉर्ड्सद्वारे घटनेच्या दिवशी पीडित मुलगी व शिंदे यांच्या फोनवरून तिच्या वडिलांशी झालेला संपर्क सिद्ध झाला. त्यामुळे बचाव पक्षाचा खोटा गुन्हा दाखल हा दावा न्यायालयाने फेटाळला.न्यायालयाचा निकाल,सर्व पुरावे व साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपी लक्ष्मण विष्णू सरगर यास पुढीलप्रमाणे शिक्षा सुनावली :
भादंवि कलम 354(अ) - 1 वर्ष सक्तमजुरी व 3,000 दंड, भादंवि कलम 354(ब) - 3 वर्ष सक्तमजुरी व 5,000 दंड, भादंवि कलम 506 - 1 वर्ष सक्तमजुरी व 3,000 दंड, अॅट्रॉसिटी कायदा कलम 3(1)(डब्ल्यू)(ळळ) - 6 महिने सक्तमजुरी व 1,000 दंड,अँट्रॉसिटी कायदा कलम 3(2)(व्हीए) - 6 महिने सक्तमजुरी व 1,000 दंड. अॅड. तर पोक्सो कायदा अंतर्गत आरोपीस निर्दोष मुक्तता देण्यात आली आहे.या खटल्यात सरकार पक्षाचे कामकाज डिशनल. सारंग वांगीकर, अॅड. संग्राम पाटील, अॅड. एस. ए. ढवणे, अॅड. एस. ई. होटकर, आणि अॅड. ए. जी. कुर्दूकर यांनी सांभाळले.
