Breaking

Saturday, 4 October 2025

तालुका स्तरीय खो खो स्पर्धेमध्ये विकास विद्यालय,अजनाळ्याचा दबदबा कायम...

 14 वर्ष वयोगट मुली, 17 वर्ष वयोगट मुली, व 17 वर्ष वयोगट मुले संघाचा तालुक्यात प्रथम क्रमांक...

अजनाळे;सचिन धांडोरे;



सांगोला तालुका क्रीडा संकुलावर झालेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत विकास विद्यालय अजनाळ्याच्या खेळाडूंनी अविश्‍वसनीय कामगिरी करत तालुका थरावरून सोडला. एकाच वेळी तीन गटात अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवत अजनाळ्याने तिहेरी मुकुट आपल्या शिरपेचात खोचला. या विजयानंतर संपूर्ण तालुक्यात खो खो म्हणजे अजनाळेच अशीच चर्चा रंगली होती.


14 वर्षे वयोगटातील मुलींच्या अंतिम सामन्यात अजनाळ्याच्या खेळाडूंनी आक्रमक चढाया आणि वेगवान पकडी करत लक्ष्मी नगर विद्यालयाचा धुव्वा उडवला. सामना संपता संपता फरक इतका प्रचंड झाला की अजनाळ्याने 1 डाव 7 गुणांनी विजय मिळवून प्रतिस्पर्ध्यांना मैदान सोडावे लागले.यानंतर 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या गटात पुन्हा लक्ष्मी नगर मैदानात उतरले. पण अजनाळ्याने एकतर्फी खेळ करून त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. अचूक डावपेच आणि आक्रमकतेच्या बळावर अजनाळ्याच्या मुलींनी 6 गुणांनी डाव जिंकत दुसरे विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील सर्वात तुफानी लढत म्हणजे 17 वर्षे वयोगटातील मुलांचा सामना! चिंचोली विद्यालयाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण अजनाळ्याच्या खेळाडूंनी जबरदस्त ताकद दाखवत त्यांना चिरडले. 6 गुणांच्या फरकाने विजय मिळवत अजनाळ्याच्या मुलांनी तालुका हादरवला.तीनही गटांमध्ये मिळालेल्या या सलग विजयामुळे विकास विद्यालय अजनाळ्याने खो-खोमध्ये आपला अढळ दबदबा पुन्हा सिद्ध केला आहे. हा तिहेरी मुकुट केवळ स्पर्धेतील विजय नाही, तर संपूर्ण तालुक्यात अजनाळ्याच्या वर्चस्वाचा पुरावा आहे.19 वर्ष वयोगट मुली यांनीही तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे.

या दणदणीत यशामागे विद्यालयाचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक येलपले बी.बी सर., कोळवले एस.एम सर, आशिष कोळवले सर आणी राकेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद (दादा)येलपले, प्राचार्य रमेश सोनवले सर, माजी प्राचार्य शामराव कोळवले सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. फोटो

तालुक्यातील सर्व प्रतिस्पर्धी संघांना मागे टाकत विकास विद्यालय अजनाळ्याने जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी थरारक हजेरी लावली आहे. अजनाळ्याचा तिहेरी मुकुट हा आता फक्त तालुक्यापुरता मर्यादित राहणार नसून जिल्हास्तरीय पातळीवरही वर्चस्व गाजवणार,

प्राचार्य रमेश सोनवले सर