सांगोला/प्रतिनिधी:
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यांतील शेतकर्यांसमोर जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी मोहोळ येथील पूरग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी 60 टन कडबा कुट्टीचा चारा उपलब्ध करून दिला आहे.
या उपक्रमामुळे अनेक शेतकर्यांना मोठा आधार मिळणार आहे. पूरस्थितीमुळे उभ्या पिकाचे नुकसान, घरांची पडझड आणि जनावरांचे आरोग्य यामुळे ग्रामीण भागात गंभीर संकट निर्माण झाले आहे. अशा वेळी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी घेतलेला शेतकर्यांसाठीचा हा पुढाकार शेतकर्यांच्या जगण्याला हातभार लावणारा असून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
पूरग्रस्त कुटुंबांना घरकुल, अन्नधान्य आणि इतर साहित्याची मदत पोहोचत असताना जनावरांसाठी चार्याचा शाश्वत पुरवठा होणे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळेल आणि दूधउत्पादनही पूर्वपदावर येण्यास मदत होईल, असा विश्वास उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी माऊली हळवणकर, दादा जाधव, बाळासाहेब झपके, प्रशांत वलेकर, निलेश मोठे, सुनील जानकर, दत्तात्रय वाघमारे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

