Breaking

Friday, 10 October 2025

राज्यात , देशात भाजप सर्वात बलाढ्य व विकासाला प्राधान्य देणारा एकमेव पक्ष आहे: ग्रामविकास तथा पालकमंत्री जयकुमार गोरे

 *सांगोला तालुक्यात भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार्‍या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सर्वाअर्थाने न्याय देऊ.

*तालुक्यातील मातब्बर नेते मंडळींचा 10 ऑक्टोबरचा भाजप पक्षप्रवेश हा इतिहासात सर्वात महत्त्वाचा दिवस ठरणार आहे 

*उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यात झालेले भाजप पक्षप्रवेश तालुक्याच्या विकासासाठी दिशा देतील. 

*सांगोला तालुक्यात 2029 ला भाजपचाच आमदार होणार:चेतनसिंह केदार सावंत

सांगोला/ प्रतिनिधी: 



सांगोला तालुक्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीत झालेले पक्षप्रवेश निश्‍चितपणे तालुक्याच्या विकासासाठी गती देणार आहेत. 10 ऑक्टोबर 2025 हा दिवस सांगोल्याच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस असेल. असंख्य कार्यकर्ते ,पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केले आहेत याचा अत्यानंद होतोय. सोलापूर जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी अतिशय चांगले नियोजन करून  भाजप पक्षप्रवेश केले आहेत. पक्षप्रवेश करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते तालुक्यात इतिहास घडवतील .उद्योगपती बाळासाहेब एरंडे हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांनी पूर्वीच्या पक्षात प्रामाणिकपणे काम केले असून सध्या त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तालुक्याच्या विकासासाठी एक नवीन वाट निर्माण केली आहे .भारतीय जनता पक्ष निश्‍चितपणे तालुक्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून गणला जात आहे. सांगोला तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही .भाजपा राज्यातील व देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला येथे केले. 

शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता भाजपच्या वतीने सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षासह इतर पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते ,मान्यवर यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्रजी कोठे, भाजप कार्यकारणी सदस्या राजश्रीताई नागणे पाटील, सांगली जिल्हा माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, माऊली हळणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत ,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, शिवाजी अण्णा गायकवाड, तालुका अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, उपाध्यक्ष अनिल चौगुले, नारायण काटकर, एन .वाय . भोसले यांच्यासह पक्षप्रवेश करणार्‍या मान्यवरांमध्ये उद्योगपती बाळासाहेब एरंडे, पंचायत समिती माजी सभापती बाळासाहेब काटकर ,माजी जि. प. सदस्य सचिन देशमुख, लोटेवाडीचे सरपंच उत्तमदादा खांडेकर, उद्योगपती उल्हास धायगुडे, सरपंच पोपट गडदे, उद्योगपती बाळासाहेब झपके, शोभाताई फुले, फॅबटेक उद्योग समूहाचे संस्थापक भाऊसाहेब रुपनर, माजी नगरसेविका स्वातीताई मगर, माजी जि.प. सदस्या राणीताई दिघे, नंदकुमार दिघे, संजय शेळके, सुरेशकाका चौगुले, कोळा अर्बन बँकेचे चेअरमन आप्पासाहेब सरगर, प्रशांत वलेकर, महेश माळी, लोणारी समाजाचे नेते संतोष करांडे, माजी नगरसेवक जुबेर मुजावर ,यांच्यासह  विविध पक्षातील आजी, माजी पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, आदींनी भाजपमध्ये पक्षप्रवेश  केला.

यावेळी पुढे बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, सांगोला तालुक्यातील भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. हा पहिल्या टप्प्यातील भाजप पक्षप्रवेश असून पुढील पंधरा दिवसात दुसर्‍या टप्प्यातील पक्षप्रवेश होणार आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करणार्‍या सर्वांना सन्मान दिला जाईल. उद्योगपती बाळासाहेब एरंडे व टीमला निश्‍चितपणे न्याय दिला जाईल. मंत्री जयकुमार गोरे पक्ष विस्ताराची व विकासाची कामे मार्गी लावतात. विकास कामात सर्वांना न्याय दिला जाईल. मुस्लिम समाज बांधवांना सोबत घेऊन जाणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. आपण सर्वांनी भाजपची ताकद दाखवून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली सत्ता आणूया आपल्या सोबत जे येतील त्यांना सोबत घेऊया. सांगोला तालुक्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न शंभर टक्के मिटवण्यासाठी प्रयत्न राहतील. सांगोला तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खर्‍या अर्थाने न्याय देणार आहेत. ग्रामविकास खात्याकडून तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.  सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने विकास कामे करून ताकदीने भाजप पक्ष वाढवूया. यापुढे विकास कामासाठी कोणालाही कुठल्याही अधिकार्‍याला पैसे देण्याची गरज भासणार नाही. मी दिलेला शब्द पाळणारा नेता आहे. सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवूया. राज्यभर पक्ष प्रवेशासाठी तुफान गर्दी होत आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकर्‍यांसह इतर घटकांचे जे नुकसान झाले आहे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करत आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे व नागरिकांचे नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी शासन नुकसान भरपाई देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.भाजप सर्वांचा सन्मान करणारा पक्ष असल्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, सांगोला तालुक्यातुन भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार्‍या सर्वांना भारतीय जनता पक्षात मानाचे स्थान मिळेल. सांगोल्याचे विकासाचे स्वप्न आम्ही पूर्ण करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्‍चितपणे जयकुमार गोरे यांना पाच वर्षे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी देणार आहेत. तालुक्याच्या विकासासाठी तुमच्यासोबत मी कायम राहणार आहे. भविष्यात तालुक्यात व राज्यात भाजप शिवाय दुसरा पक्ष दिसणार नाही.

यावेळी भाजपच्या कार्यकारणी सदस्या राजश्रीताई नागणे पाटील म्हणाल्या, तालुक्याच्या दृष्टीने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदारच आहेत. राज्यात भाजप निश्‍चितपणे विकासाचे पाऊल टाकत आहे. भाजपची चळवळ सर्व व्यापक आहे. महिलांना सन्मान द्या. महिलांना सरकारने राजकीय क्षेत्रात 50 टक्के आरक्षण दिलेले आहे. त्याचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा. 

यावेळी उद्योगपती भाऊसाहेब रुपनर म्हणाले, भाजपमध्ये सर्वांनी पक्ष प्रवेश केला असून मोठ्या आशेने या ठिकाणी आपण एकत्र आलो. मतभेद विसरून एकत्रपणे चांगल्या प्रकारे काम करून तालुक्यात आदर्श घडवूया. 

यावेळी ब्रह्मानंद पडळकर म्हणाले, उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांच्या कार्यावर व नेतृत्वावर विश्‍वास ठेवून सांगोला तालुक्यातील अनेक मातब्बर मंडळींनी व पदाधिकार्‍यांनी भाजपमध्ये प्रवेश केले आहेत. शब्दाला जागणारे नेते बाळासाहेब एरंडे हे आहेत. सांगोला तालुक्यात भाजप पक्ष निष्ठेने वाढवायचा आहे .पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर तालुक्याला  भरीव विकास निधी देतील .


यावेळी माजी. जि. प .सदस्य सचिन देशमुख म्हणाले, वैचारिक परिवर्तनाचा आजचा दिवस आहे. शेतकरी कामगार पक्षात एकनिष्ठेने काम केले. तालुक्याच्या प्रगतीसाठी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर व कार्यावर प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे. अखेरच्या श्‍वासापर्यंत भाजपमध्येच राहणार आहे. 

यावेळी माजी सभापती बाळासाहेब काटकर म्हणाले, भाजपमध्ये झालेला पक्षप्रवेश हा आनंददायी क्षण आहे, उद्योगपती बाळासाहेब एरंडे हे आमचे नेते आहेत, वाकी गावातील शंभर मुस्लिम बांधवांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केले आहेत. 2029 मध्ये भाजपचाच आमदार तालुक्यामध्ये होणार आहे. 

यावेळी माजी नगरसेविका स्वातीताई मगर म्हणाल्या, शेकापमध्ये असताना पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडली. आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करून भाजप जी जबाबदारी देईल ती निष्ठेने पूर्ण करण्याची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी माजी सभापती संभाजी आलदर म्हणाले, अनेकजण भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. पक्षांनी जुन्या ज्येष्ठ नेत्यांना ताकद द्यावी.  अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना दिपवाळीपूर्वी मदत द्यावी अशी मागणी केली.

 यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक पोपट गडदे, सुशांत फुले, माजी नगरसेवक सीए जुबेर मुजावर, उद्योगपती उल्हास धायगुडे, अशोक पवार आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीतील पदाधिकारी, इतर पक्षातील पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षप्रवेशासाठी मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या.


सांगोला तालुक्यात शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षामध्ये झालेले पक्षप्रवेश याची नोंद इतिहासामध्ये होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे ,माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वावर व कार्यावर विश्‍वास ठेवून तालुक्यातील अनेक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध पक्षातील मान्यवरांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. 2029 ला सांगोला तालुक्यात भाजपचाच आमदार होईल. त्यादृष्टीने सध्या तयारी सुरू आहे. कार्यकर्त्यांना खर्‍या अर्थाने न्याय देणारा व बळ देणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचा उल्लेख करावा लागेल. हा भाजप पक्षप्रवेशाचा पहिला टप्पा असून पुढील टप्प्यात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होतील:

भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत.


यापूर्वी शेकापमध्ये असताना प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. स्व. आमदार गणपतराव देशमुख यांच्या पश्‍चात तालुक्यामध्ये लाल बावटा फडकवू असा शब्द दिला होता. तो मी पूर्णपणे पाळला आहे. तालुक्याच्या विकासासाठी  अनेक पदाधिकार्‍यांनी, मान्यवरांनी कार्यकर्त्यांनी माझ्यावरती विश्‍वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्या पाठीशी ग्राम विकासमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे पाठबळ आहे .मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला असून प्रामाणिकपणे काम करू तसेच सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकले जाईल. आमच्यावर लक्ष ठेवावे. मी दिलेला शब्द पाळणारा सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे : उद्योगपती बाळासाहेब एरंडे.