Breaking

Friday, 10 October 2025

सांगोला आगार व्यवस्थापकांच्या नियोजनाअभावी एसटी बस वाहतूक सेवा कोलमडली...

 

सांगोला -अजनाळे एस टी बस दररोज  दोन तास उशिरा सुटत असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी...

सांगोला /प्रतिनिधी -



सांगोला आगार व्यवस्थापनाच्या नियोजनातील गंभीर त्रुटी आणि निष्काळजी कारभारामुळे एस.टी. बस वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना दररोज विलंबाचा सामना करावा लागत असून विद्यार्थी वर्ग अक्षरशः त्रस्त झाला आहे. दुपारी 12:15 वाजता सुटणारी नियमित बस गेल्या काही दिवसांपासून 1 ते 2 तास उशिरा सुटत असल्याने विद्यार्थ्यांचे वेळापत्रक उद्ध्वस्त झाले आहे.

सकाळी शिक्षणासाठी घरातून 6 वाजता निघालेल्या विद्यार्थ्यांना परतीच्या बसच्या विलंबामुळे दुपारी 2 वाजेपर्यंत प्रवासातच रहावे लागत आहे. या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, विश्रांती आणि भोजनाचा वेळ पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. अनेक विद्यार्थी दीर्घ प्रतीक्षेमुळे त्रासले असून काहींना खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे प्रवास खर्च वाढला असून सुरक्षिततेचा धोका देखील निर्माण झाला आहे.

आगारातील नियोजनशून्य कारभार, चालक-वाहकांची अनियमित उपस्थिती, बसांच्या दुरुस्तीतील ढिसाळपणा आणि व्यवस्थापकीय निष्काळजीपणामुळे बस वेळेत धावू शकत नाहीत. याचा परिणाम थेट प्रवाशांवर होत असून सार्वजनिक वाहतुकीवरील विश्‍वास कमी होत चालला आहे.

सांगोला आगार प्रशासनाकडे प्रवाशांनी आणि विद्यार्थ्यांनी वारंवार लेखी तक्रारी केल्या तरीही कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी प्रवाशांची जोरदार मागणी आहे.

सांगोला परिसरात एस.टी. सेवा ही शालेय, महाविद्यालयीन आणि ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी जीवनरेखा मानली जाते. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून या सेवेचे चाकच थांबले आहे. वेळेवर गाड्या न सुटल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, प्रवासी वर्गाचा संयम आता संपुष्टात आला असून, आगार प्रशासनाने तातडीने नियोजन सुधारावे, अतिरिक्त बस सोडाव्यात आणि गाड्या वेळापत्रकानुसार सुटतील याची हमी घ्यावी, अशी सर्वांची मागणी आहे. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा विद्यार्थी यांनी दिला आहे. 

सांगोला आगारामध्ये एस टी बस ची कमतरता असल्यामुळे गाडी सोडण्यास विलंब लागत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवुन इथून पुढे  सांगोला -अजनाळे गाडी ही वेळेत सोडली जाईल..

विकास पोपळे सांगोला आगार व्यवस्थापक

;गेल्या अनेक दिवसांपासून सांगोला -अजनाळे ही एस टी बस तब्बल दोन तास उशिरा सुटत आहे आम्ही वेळोवेळी येथील संबंधित अधिकार्‍यांना  सांगून सुद्धा येथील अधिकारी आमची दखल घेत नाहीत उलट आम्हाला सांगतात आपल्याकडे एस टी बस कमी आहेत असे कारणे सांगून आम्हाला माघारी पाठवले जाते. 

तुषार मंडले विद्यार्थी