Breaking

Thursday, 18 June 2026

अजनाळेची यशोगाथा इयत्ता सहावीच्या भूगोल पुस्तकाच्या अभ्यासक्रमात

 


डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अजनाळे गावाचा राज्यभर गौरव..

अजनाळे ;  


 : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अजनाळे या छोट्याशा गावाने आपल्या कष्ट, जिद्द आणि एकजुटीच्या बळावर दुष्काळाच्या संकटावर मात करत विकासाचा आदर्श घालून दिला आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल राज्य शैक्षणिक मंडळाने घेतली असून अजनाळे गावाची प्रेरणादायी यशोगाथा आता इयत्ता सहावीच्या भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळवले आहे. त्यामुळे अजनाळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अजनाळे गावातील सुमारे ९० टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. कमी पाऊस, तीव्र सूर्यप्रकाश आणि खडकाळ जमीन अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाही गावकऱ्यांनी हार न मानता जलसंधारणाचा मार्ग स्वीकारला. १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर गावाचा विविध विकास योजनांमध्ये समावेश झाला आणि बंध, बंधारे, पाझर तलाव व शेततळी उभारून पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले.
या सामूहिक प्रयत्नांमुळे गावात जलक्रांती घडली. कोरड्या पडलेल्या जमिनीला नवजीवन मिळाले, शेती उत्पादनात वाढ झाली आणि गावाची आर्थिक घडी मजबूत झाली. १५ ते २० वर्षांपूर्वीच्या उपग्रह छायाचित्रांच्या तुलनेत आज अजनाळे परिसरात झालेला हरित बदल विकासाची साक्ष देत आहे.
आज अजनाळे हे केवळ सांगोला तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी जलव्यवस्थापन आणि लोकसहभागाचा आदर्श ठरले आहे. पाठ्यपुस्तकात स्थान मिळाल्याने गावकऱ्यांच्या कष्टाला खरी दाद मिळाली असून अजनाळेचे नाव राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या ओठांवर पोहोचणार आहे.
“दुष्काळाशी झुंज देत जलसंपन्नतेकडे वाटचाल करणाऱ्या अजनाळे गावाचा हा गौरव प्रत्येक गावकऱ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. फोटो