Breaking

Friday, 12 June 2026

लक्ष्मीनगर येथे अवैध वाळू वाहतुकीवर सांगोला पोलिसांची धडक कारवाई; ४.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त




तालुक्यातील लक्ष्मीनगर परिसरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात सांगोला पोलिसांनी मोठी कारवाई करत टाटा इंट्रा पिकअपसह एकूण ४ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सांगोला पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक ५३४/२०२६ नुसार, दिनांक ११ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास मौजे लक्ष्मीनगर गावच्या शिवारात आचकदाणी ते लक्ष्मीनगर जाणाऱ्या रस्त्यावर, मोरे यांच्या खडी क्रेशरजवळ पोलिसांनी गस्तीदरम्यान संशयास्पद वाहनाची तपासणी केली.

तपासणीदरम्यान एमएच २७ डीटी १३३४ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे टाटा इंट्रा पिकअप वाहन आढळून आले. वाहनाच्या पाठीमागील हौदामध्ये अंदाजे एक ब्रास वाळू भरलेली असल्याचे निदर्शनास आले. संबंधित चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना किंवा शासनाची रॉयल्टी भरल्याचे कागदपत्र उपलब्ध नसल्याने ही वाहतूक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी प्रेम खंडू सावंत (वय २४, रा. लक्ष्मीनगर, ता. सांगोला) हा माण नदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत पोलिसांनी ४ लाख रुपये किंमतीचे टाटा इंट्रा पिकअप वाहन तसेच ७ हजार रुपये किंमतीची अंदाजे एक ब्रास वाळू असा एकूण ४ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतुल अरुण खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बी.एन.एस. कलम ३०३(२) व ३०५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याची नोंद पोहेकॉं. १६२६ वाघ यांनी केली असून, पुढील तपास पोहेकॉं. ४९३ माने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. संबंधित अहवाल न्यायालयात सादर करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सांगोला पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.