Breaking

Sunday, 7 June 2026

चार तासांच्या लोडशेडिंगने अजनाळेकरांना दररोज करावा लागतोय अंधाराशी सामना तर भगीरथ योजनेचे अर्धवट काम सोडून ठेकेदार पळाला


महावितरणच्या झोपलेल्या अधिकार्‍यांना जाग कधी येणार?

अजनाळे ;सचिन धांडोरे;



गावाचा विकास, नागरिकांना मूलभूत सुविधा आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र अजनाळे गावात वास्तव चित्र याच्या अगदी उलट दिसून येत आहे. एकीकडे दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत होणार्‍या लोडशेडिंगमुळे संपूर्ण गाव अंधारात बुडत आहे, तर दुसरीकडे भगीरथ योजनेचे काम अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत सोडुन ठेकेदार पळाला असल्याने भगीरथ योजनेचे काम कधी पूर्ण होणार? असा संतप्त सवाल गावातील ग्रामस्थ मधून व्यक्त केला जाऊ लागला आहे.

सायंकाळची वेळ म्हणजे  व्यापार्‍यांच्या व्यवसायाची आणि कुटुंबाच्या दैनंदिन जीवनाची महत्त्वाची वेळ. मात्र याच वेळी चार तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने गावातील लहान-मोठे दुकानदार, व्यावसायिक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वीज नसल्याने व्यवसाय ठप्प होत आहेत,  आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नियमितपणे वीजबिले भरणार्‍या ग्राहकांना हा अन्याय का सहन करावा लागत आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

याहून गंभीर बाब म्हणजे अजनाळे गावातील भगीरथ योजनेचे काम. गावाला चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे काम अर्ध्यावरच थांबले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ठेकेदाराने काम अपूर्ण सोडले असून अनेक महिन्यांपासून कामाचा कोणताही मागमूस नाही. कामाची पाहणी करणारे अधिकारी कुठे आहेत? संबंधित विभागाने ठेकेदारावर कोणती कारवाई केली? सार्वजनिक पैशातून सुरू असलेल्या कामाची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्‍न ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत.

विशेष म्हणजे, लोडशेडिंग आणि रखडलेली विकासकामे या दोन्ही समस्यांमुळे अजनाळे गावातील नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नागरिक वारंवार तक्रारी करत असतानाही प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने अधिकारी आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.तरी झोपलेले अधिकार्‍यांनी चार तासाचे लोडशेडिंग बंद करावे व भगीरथ योजनेचे काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी गावातुन जोर धरू लागली आहे.

लाखो रुपये खर्च करून भगिरथ योजनेचे काम चालु केले आहे मात्र ठेकेदाराने हे काम पूर्ण न करताच पळ काढला असल्याने भगीरथ योजनेचे काम अनेक महिन्यापासून रखडल्याने ही योजना कधी मार्गी लागणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. तरी महावितरणच्या अधिकार्‍यांनी लक्ष घालून ही योजना तात्काळ मार्गी लावावी अन्यथा महावितरणला टाळे ठोकणार.


विष्णू देशमुख युवा नेते 

अजनाळे ता सांगोला