Breaking

Sunday, 7 June 2026

पाच महिन्यांचा पगार थकीत; कामगारांचा आंदोलनाचा इशारा

 

जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे; 6 जुलैपासून धान्य गोदाम कामगारांचे कामबंद आंदोलन

पंढरपूर, प्रतिनिधी



शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे गेल्या पाच महिन्यांपासून पगार थकीत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामातील कामगार 6 जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडून आपल्या कुटुंबासह जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी दिला.

पंढरपूर येथे रविवारी झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदाम कामगारांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्‍नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

शिंदे म्हणाले की, थेट वाहतूक टप्पा क्रमांक 1 व 2 मुळे शासकीय धान्य गोदामातील कामकाज मोठ्या प्रमाणात कमी झाले असून काही ठिकाणी पूर्णपणे बंद झाले आहे. भविष्यात गोदामातील बहुतांश काम थेट वाहतुकीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे थेट वाहतूक योजनेअंतर्गत हमाली स्वरूपाचे सर्व काम संबंधित शासकीय धान्य गोदामातील नोंदणीकृत हमाल-माथाडी कामगारांकडूनच करून घेण्याचे बंधन वाहतूक ठेकेदारांवर घालावे, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच अकलूज, माळशिरस, नातेपुते आणि अक्कलकोट येथील 2021-22 मधील पीएम योजनेअंतर्गत थकीत पगार, डिसेंबर-जानेवारी महिन्यांची साखर बिले, आनंदाचा शिधा योजनेची देयके आणि इतर प्रलंबित रक्कम 25 जूनपर्यंत अदा करण्यात यावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

कामगारांना शासन नियमानुसार प्रत्येक रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी, महागाई निर्देशांकाचा लाभ त्वरित लागू करावा तसेच सर्व शासकीय धान्य गोदामातील कामगारांच्या वेतनवाढीबाबत निर्णय घ्यावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

या सर्व मागण्यांवर 25 जूनपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील कामगार आपल्या कुटुंबासह जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, कामबंद आंदोलन आणि उपोषण सुरू करतील, असा ठाम इशारा शिवाजी शिंदे यांनी दिला.

बैठकीस जिल्हा सचिव संतोष सावंत, दत्तात्रय इरकर, लक्ष्मण बारसकर, विठ्ठल खपाले, संतोष पिसे, शिवराज बिराजदार, महादेव किलबिले, रोहिदास खडसे, नवनाथ मेटकरी, रावसाहेब घुटकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबाजी शिंदे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.