Breaking

Thursday, 18 June 2026

सांगोला विद्यामंदिर पेपरफुटी प्रकरणाची तात्काळ उकल; पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना पोलीस अधीक्षकांचे प्रशस्तीपत्र

 




अज्ञात आरोपीला अल्पावधीत जेरबंद करून सांगोला पोलिसांनी दाखवली तपासातील तत्परता

सांगोला/प्रतिनिधी : 

सांगोला तालुक्यात खळबळ उडवून देणार्‍या सांगोला विद्यामंदिर येथील पेपरफुटी प्रकरणाची तात्काळ उकल करून अज्ञात आरोपीला अटक करण्यात यश मिळवल्याबद्दल सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरविले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे सांगोला पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेचा जिल्हाभर गौरव होत आहे.

सांगोला विद्यामंदिर येथे घडलेल्या पेपरफुटीच्या घटनेमुळे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या संवेदनशील प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सांगोला पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरविली. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने तांत्रिक माहिती, गुप्त माहिती व विविध पुराव्यांच्या आधारे वेगवान तपास करत अज्ञात आरोपीचा शोध घेत त्याला जेरबंद केले.

पेपरफुटीसारख्या संवेदनशील आणि चर्चेच्या विषय ठरलेल्या गुन्ह्याची अल्पावधीत उकल करून आरोपीला अटक करण्यात आल्याने जिल्हाभरातून सांगोला पोलिसांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. या कारवाईमुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली.

या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिनांक 16 जून 2026 रोजी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना प्रशस्तीपत्र प्रदान केले. प्रशस्तीपत्रामध्ये त्यांच्या प्रशंसनीय सेवेचे कौतुक करण्यात आले असून महाराष्ट्र पोलीस दलाला त्यांच्या कार्याचा अभिमान असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या यशस्वी तपास मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन मोरे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल असलम काझी, पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ सावंत, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता वजाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र राजगे, पोलीस नाईक सुजित जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राजू आवटे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र माळी, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल मारुती पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल रमेश सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम नदाफ यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.

सांगोला पोलिसांनी केलेल्या या जलद व प्रभावी कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला असून नागरिकांचा पोलिसांवरील विश्‍वास अधिक दृढ झाला आहे. संवेदनशील गुन्ह्यांची वेगवान आणि निष्पक्ष उकल करण्याची सांगोला पोलिसांची क्षमता या प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.


विद्यामंदिर पेपरफुटी प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा; पीआय विनोद घुगे यांना पोलीस अधीक्षकांचे प्रशस्तीपत्र