घर दोघांचे अभियान अंतर्गत तेरवाड गावचा गौरव
शिरोळ/ प्रतिनिधी:
स्त्री आणि पुरुष हे कुटुंबाचे दोन समान आधारस्तंभ आहेत.मालमत्तेवरील अधिकार हा महिलांना सन्मान देतो. शासनाच्या धोरणात जरी मालमत्तेवरील समान अधिकार मान्य केला असला तरी समाजात तो दृष्टीकोन निर्माण झालेला नाही. घरावर पती-पत्नीच्या नावे पाट्या लावण्याच्या उपक्रमात तेरवाड गावाने जो पुढाकार घेतला आहे. तो समाजाला नवी दिशा आणि दृष्टीकोन देणारा आहे. तेरवाड ता शिरोळ गावाने घर दोघांचे अभियान राबवून स्त्री-पुरुष समानतेचा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर यांनी केले.ते डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि संविधान संवादक यांच्न्या वतीने आयोजित तेरवाड ग्राम गौरव सोहळ्यात बोलत होते. यावेळी शिरोळ चे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, कोल्हापूर जिल्हा समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, उपसरपंच विजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड,ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मीबाई तरळ, ग्राम विकास अधिकारी संजय पुकळे, कार्यक्रम समन्वयक नंदू मोरे, निलेश तवंदकर,अमोल पाटील, वंदना गिरमल आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, समाजामध्ये स्त्रियांचे योगदान अनेकदा गृहित धरले जाते. घर सांभाळणे, कुटुंबाची जबाबदारी पेलणे, आर्थिक आणि सामाजिक स्तरावर योगदान देणे या सर्व बाबींमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र त्यांना समान सन्मान आणि निर्णय प्रक्रियेत समान स्थान मिळणे आवश्यक आहे.घर दोघांचे अभियान हे केवळ नावाच्या पाट्या लावण्यापुरते मर्यादित नसून सामाजिक मानसिकता बदलण्याची चळवळ आहे. घराच्या दारावर संयुक्त नावाची पाटी लावणे म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचा आणि योगदानाचा सन्मान करणे होय. तेरवाड गावाने या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण गावासाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत, महिला गट आणि युवकांनी एकत्र येत हा उपक्रम यशस्वी केला.
यावेळी समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड यांनी सांगितले कि, घर दोघांच्या अभियानात गावाने पुढाकार घेतला आणि त्यासाठी ग्राम गौरव होत आहे. हि माझ्यासाठी व समस्त तेरवाड गावातील लोकांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या अभियानाच्या माध्यमातून समानतेची आणि समतेचा दृष्टीकोन गावात निर्माण झाला असून भविष्यात समाजातील स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यात पुढाकार नक्कीच घेतला जाईल.
यावेळी गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले कि, धोरणात्मक पातळीवर आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून मालमत्तेवरील अधिकारासाठी अनेक दिवसापासून काम करत आहोत. ग्राम पंचायत दप्तरी पती पत्नीच्या नावे नोंदी केल्या जातात. मात्र समाजातील मानसिकता बदलण्यात यश मिळाले नाही. मात्र संस्थेच्या वतीने हे उपक्रम राबवून समाजात स्त्री-पुरुष समानतेचा आदर्श निर्माण केला आहे. या अभियानास शिरोळ तालुक्यात आवश्यक ती मदत करण्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना नंदू मोरे यांनी केली. त्यांनी आपल्या प्रास्तविकात सांगितले कि, भारतीय संविधानेने महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या हक्काबाबत तरतुदी केल्या आहेत. मात्र आजही महिला त्यांच्या हक्का पासून वंचित आहेत. त्यांचे हक्क आणि अधिकार सुरक्षित करून समाजाला महिलांच्या सन्मान आणि हक्काची जाणीव करून देण्यासाठी घर दोघांचे अभियान हे सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात राबवले जात आहे. यामध्ये तेरवाड गावाने या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण घरावर पती पत्नीच्या संयुक्त नावाने पाट्या लावण्यासाठी जो पुढाकार घेतला तो कौतुकास्पद असून अशा गावांचा गौरव करणे हि आपली सर्वांची जबाबदारी आहे. संस्थेच्या संविधान संवादक माधुरी कांबळे आणि शर्मिला कांबळे यांनी या अभियानासाठी पुढाकार घेऊन अभियान यशस्वी करण्याची जी प्रक्रिया उभी केली आहे ती सर्वांसाठीच प्रेरणादायी असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा संदेश दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सिद्धार्थ अकॅडमी च्या दीक्षा कांबळे, उपसरपंच विजय गायकवाड, माधुरी कांबळे, शर्मिला कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन आणि महिला जमीन अधिकार अभ्यास अहवाल या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास तेरवाड व परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली मोरे यांनी तर आभार अमोल पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल कदम, आनंदा कांबळे, मुस्तफा शिकलगार, समीक्षा कोळी, आयेशा पटेल, रचना कांबळे. बिस्मिल्ला जमादार, शैला कुरणे, प्रतीक्षा बुचडे, तेजस वराळे, माधुरी कांबळे, शर्मिला कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
