भाजपला शिवसेना शिंदे गटाची साथ मिळणार का?
सांगोला / प्रतिनिधी
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतनाना देशमुख यांच्यात थेट लढत होत असल्याने सांगोला तालुक्यातील राजकीय चर्चांना वेग आला आहे. विशेषतः सांगोला नगरपरिषदेतील नगरसेवकांचे मतदान कोणाच्या बाजूने जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने तत्कालीन आमदार शहाजीबापू पाटील शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात जोरदार ताकद लावली होती. मात्र त्या निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने मोठे यश मिळवत नगराध्यक्षांसह बहुसंख्य नगरसेवक निवडून आणले होते.
त्या निवडणुकीतील राजकीय संघर्ष आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती असली तरी स्थानिक पातळीवरील जुने राजकीय मतभेद मतदानावर परिणाम करतील का, याबाबत चर्चा सुरू आहे.
सांगोला नगरपरिषदेतील शिंदे गटाशी संबंधित नगरसेवक भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना मतदान करतील का, हा सध्या चर्चेचा प्रमुख विषय बनला आहे. महायुतीतील घटक पक्ष म्हणून ते अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी स्थानिक राजकारणातील समीकरणे वेगळी असू शकतात, असेही बोलले जात आहे.
भाजपने नगरपरिषद निवडणुकीत केलेला कडवा विरोध शिंदे गटाच्या नगरसेवकांनी मनात ठेवला आहे का, याबाबतही राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्याने प्रत्यक्ष मतदानावेळी कोणती भूमिका घेतली जाईल, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
महायुतीकडे या निवडणुकीत स्पष्ट संख्याबळ असल्याचे सांगितले जात असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये वैयक्तिक संबंध, स्थानिक राजकीय घडामोडी आणि मतदारांशी असलेले संपर्क यांनाही महत्त्व असते. त्यामुळे प्रत्येक मत निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकीय जाणकारांच्या मते, सांगोला नगरपरिषदेतील मतदारांची भूमिका केवळ स्थानिकच नव्हे तर जिल्ह्यातील व्यापक राजकीय संदेश देणारी ठरू शकते. त्यामुळे सर्वच पक्षांचे नेते या मतदारांशी संपर्क साधत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीची तारीख जवळ येत असताना सांगोला शहरात चहाच्या टपर्यांपासून राजकीय बैठकींपर्यंत एकच चर्चा रंगली आहे-शिंदे गटाचे नगरसेवक महायुती धर्म पाळणार की स्थानिक राजकीय आठवणींना प्राधान्य देणार? याचे उत्तर मात्र मतदानाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
पालकमंत्र्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा
काही महिन्यांपूर्वी सांगोल्यात झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख हे आमच्यामुळे निवडून आले असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याची चर्चा आता पुन्हा रंगू लागली आहे. त्यामुळे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या समर्थक नगरसेवकांची भूमिका काय राहणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. भाजपच्या उमेदवाराला हे नगरसेवक मतदान करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक राजकीय समीकरणांचा परिणाम मतदानावर होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
