Breaking

Saturday, 13 June 2026

शेतकर्‍यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी घेतली होती.

 


आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; सांगोला तालुक्यातील 582 बाधित लाभार्थ्यांना 23.16 लाखांचे अनुदान मंजूर


सांगोला/प्रतिनिधी : 



गतवर्षी सांगोला तालुक्यात वादळी वार्‍यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये राहत्या घरांवरील पत्रे उडून गेली, घरांच्या भिंती कोसळल्या तसेच अनेक कुटुंबांना उघड्यावर राहण्याची वेळ आली होती. या नैसर्गिक आपत्तीनंतर बाधित नागरिकांना शासनाची मदत मिळावी यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.गिरिष महाजन यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

नुकसान झालेल्या घरांची तात्काळ पाहणी आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख आणि तत्कालीन तहसीलदार संतोष कणसे यांनी करत नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे गावकामगार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून करून अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नुकसानीचे मूल्यांकन करण्यात आले. मात्र मदत मंजुरीला विलंब होत असल्याचे लक्षात येताच आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालत तत्कालीन तहसीलदार संतोष कणसे यांच्याशी वेळोवेळी बैठक, पत्रव्यवहार व प्रशासन स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला.

बाधित नागरिकांना न्याय मिळावा आणि नुकसानभरपाई लवकर मिळावी यासाठी आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी महसूल विभाग तसेच शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करून विषय मार्गी लावण्याचे काम केले. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून पात्र लाभार्थ्यांना मदत मिळवून देण्यावर त्यांनी भर दिला होता.

या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून शासनाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगोला तालुक्यातील 75 गावांतील 582 पात्र लाभार्थ्यांना एकूण 23 लाख 16 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर ही मदत संबंधित बाधित खातेदारांच्या बँक खात्यावर लवकरच जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार बाळुताई भागवत यांनी दिली.

सदरचे अनुदान मंजूर केल्याबद्दल आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.गिरिष महाजन यांचे आभार मानले.