Breaking

Monday, 1 June 2026

लाभार्थ्यांनी जीवन प्रमाणपत्र व वैश्विक दिव्यांग ओळखपत्र वेळेत जमा करावे; अन्यथा अनुदान बंद होऊ शकते" – तहसीलदार बाळुताई भागवत


विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांना तहसील प्रशासनाचे आवाहन; आवश्यक कागदपत्रे व बँक खाते जोडणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
सांगोला | प्रतिनिधी


सांगोला तालुक्यातील विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी जीवन प्रमाणपत्र, वैश्विक दिव्यांग ओळखपत्र तसेच आधार क्रमांकाची बँक खात्याशी जोडणी ही प्रक्रिया निश्चित मुदतीत पूर्ण करावी. अन्यथा अनुदान वितरणात अडथळे निर्माण होऊन आर्थिक सहाय्य बंद होण्याची शक्यता आहे, असे आवाहन तहसीलदार बाळुताई भागवत यांनी केले आहे.
तहसील कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याने दरवर्षी १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत आपण जिवंत असल्याचे प्रमाणित करणारे जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
शासनाने जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी भ्रमणध्वनीवरील पडताळणी सुविधेद्वारे सोपी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थी स्वतः, कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने, ग्राम महसूल अधिकारी किंवा सेवा केंद्राच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्र तयार करून संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे जमा करू शकतात. मुदतीत प्रमाणपत्र सादर न झाल्यास अनुदान बंद होण्याची शक्यता असल्याने लाभार्थ्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वैश्विक दिव्यांग ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांकडे अद्याप हे ओळखपत्र उपलब्ध नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ज्या लाभार्थ्यांकडे केवळ जुने दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांनी १५ जूनपूर्वी संबंधित संकेतस्थळावर अर्ज सादर करून वैश्विक दिव्यांग ओळखपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुरू करावी तसेच ३० सप्टेंबरपूर्वी ते ओळखपत्र तहसील कार्यालयात जमा करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय काही लाभार्थ्यांच्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्रावरील जन्मतारीख आणि आधार कार्डावरील जन्मतारीख यामध्ये तफावत आढळून आली आहे. अशा लाभार्थ्यांची यादी ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली असून संबंधितांनी तहसील कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक पडताळणी करून घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
शासनाचे आर्थिक सहाय्य थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची बँक खाती अद्याप आधारशी जोडलेली नाहीत त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष सहाय्य योजनांमधून मिळणारे आर्थिक अनुदान हे अनेक निराधार, वृद्ध, दिव्यांग आणि गरजू नागरिकांसाठी मोठा आधार ठरत असल्याने कोणताही पात्र लाभार्थी या सहाय्यापासून वंचित राहू नये. यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे व पडताळणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार बाळुताई भागवत यांनी केले आहे.