Breaking

Saturday, 30 May 2026

पुजारवाडीत घरफोडी; दीड तोळ्याचे मंगळसूत्र लंपास


अज्ञात चोरट्याविरोधात सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल; १ लाख २० हजारांचा ऐवज चोरी

सांगोला/प्रतिनिधी :


 सांगोला शहरालगतच्या पुजारवाडी येथे घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. भिमाबाई भारत मिटकरी (वय ४०, रा. पुजारवाडी, ता. सांगोला) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून ते ४ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला.
चोरट्याने घरातील दीड तोळे वजनाचे व सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लबाडीने चोरून नेले. काही दिवसांनंतर ही बाब निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५ प्रमाणे अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
या गुन्ह्याची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल भानवसे यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल वाघमोडे करीत आहेत. परिसरातील संशयित हालचाली, उपलब्ध माहिती व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.