न्यायालयीन वाद सुरू असताना प्लॉट विक्रीचा घाट;
सांगोला/प्रतिनिधी :
सांगोला शहरातील कडलास रोडवरील सांगोला महाविद्यालयासमोरील वादग्रस्त जमिनीच्या प्लॉटिंग प्रकरणाने पुन्हा एकदा जोर धरला असून, न्यायालयात सर्व्हे 104 / 2, व 115/1 या गटाचा वाद सुरू असतानाच काही एजंटांकडून नागरिकांना भुरळ घालून प्लॉट विक्रीचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप खडतरे परिवाराकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित वादग्रस्त जमिनीतील कोणताही प्लॉट खरेदी करू नये, अन्यथा आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला शहरातील कडलास रोडवरील सांगोला महाविद्यालयासमोरील काही जमीन प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. संबंधित जागेचे अंतिम वाटप अद्याप झालेले नसतानाही काही एजंटांकडून त्या ठिकाणी बोगस प्लॉटिंग करून विक्रीचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, काही व्यक्ती स्वतःकडे डिग्री अथवा कागदपत्रे असल्याचा दावा करत संघटनांच्या नावाचा वापर करून परिसरात दादागिरी करीत असल्याची चर्चा आहे. कायदा आमच्या हातात आहे अशा आविर्भावात नागरिकांवर दबाव टाकून प्लॉट विक्रीसाठी वातावरण निर्माण केले जात असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाद न्यायालयात प्रलंबित असताना प्लॉटिंग करणे, त्याची विक्री करणे आणि नागरिकांना भविष्यात अडचणीत आणणे हा प्रकार गंभीर मानला जात आहे. अनेक सामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराची कमाई गुंतवून प्लॉट खरेदी करतात. मात्र, अशा वादग्रस्त जमिनीतील व्यवहारांमुळे भविष्यात न्यायालयीन लढाया, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक स्तरावर काही एजंटांकडून आकर्षक ऑफर, स्वस्त दर आणि तातडीने नोंदणीचे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोणताही प्लॉट खरेदी करण्यापूर्वी संबंधित जमिनीची कायदेशीर स्थिती, 7/12 उतारा, न्यायालयीन वाद, मालकी हक्क तसेच अधिकृत कागदपत्रांची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात प्रशासन आणि महसूल विभागाने लक्ष घालून वस्तुस्थिती स्पष्ट करावी तसेच नागरिकांची दिशाभूल करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फक्त एजंटांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. कागदपत्रांची शासकीय पातळीवर पडताळणी केल्याशिवाय कोणताही व्यवहार करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे सांगोला शहरात प्लॉटिंग व्यवसायातील अनियमितता आणि नागरिकांच्या फसवणुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
