जुनोनीजवळ राष्ट्रीय महामार्गावर दोन कारची जोरदार धडक; सुमारे १० लाखांचे नुकसान
सांगोला/प्रतिनिधी :
सांगोला तालुक्यातील जुनोनी गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वर झालेल्या भीषण कार अपघातात एका कार चालकाचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुमारे १० लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन आप्पासो ढेरे (वय ३०, रा. कुची, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी हे दिनांक २५ मे २०२६ रोजी आपल्या कुटुंबासह टाटा इंडिका (एमएच ४३ एजे ३४४७) या कारमधून सांगलीहून माळेवाडी (अकलूज) येथे जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील जुनोनी गावच्या हद्दीत हॉटेल मानदेश तडका परिसरात पोहोचल्यावर समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या वाहनास जोरदार धडक दिली.
फिर्यादीनुसार, कार क्रमांक एमएच १० डीक्यू ०६७०चा चालक संदीप चिंतामणी भोसले (वय ३२, रा. एमआयडीसी पलूस, ता. पलूस, जि. सांगली) हा वळणाच्या ठिकाणी रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज न घेता भरधाव वेगाने वाहन चालवत होता. त्यामुळे त्याच्या कारची फिर्यादीच्या इंडिका कारच्या पुढील उजव्या बाजूस जोरदार धडक बसली. या धडकेत इंडिका कारचे टायर, बंपर व इतर भागांचे मोठे नुकसान झाले.
धडकेनंतर संदीप भोसले यांची कार नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्यावरील दुभाजकावर आदळली व पलटी झाली. या भीषण अपघातात कारमधील प्रवासी विद्या अनिल भोसले, ज्योती संदीप भोसले, वेदांत अनिल भोसले, वैभव अनिल भोसले, दरवा अनिल भोसले आणि अनिल चिंतामणी भोसले हे जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातात गंभीर जखमी झालेला कार चालक संदीप चिंतामणी भोसले याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच वाहनातील इतर प्रवाशांनाही गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
या अपघातात दोन्ही वाहनांचे मिळून अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही दिवसांनी फिर्याद दाखल करण्यात आली असून सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल २१८१ भोसले यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भातुंगडे करीत आहेत. अपघाताचे नेमके कारण, वाहनांचा वेग आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
