सांगोला/प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील चिकमहुद व लक्ष्मीनगर गावच्या शिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर सांगोला पोलिसांनी धाड टाकत तब्बल 9 जणांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकली असा एकूण 4 लाख 34 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगोला पोलीस ठाण्यात दखलपात्र अहवाल क्रमांक 439/2026 नुसार महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोकॉ/2129 अतुल अरुण खराडे (वय 32) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चिकमहुद व लक्ष्मीनगर गावच्या शिवारातील राजेवाडी कॅनॉलजवळील पांडुरंग रामचंद्र जाधव यांच्या पडीक शेतात झाडाखाली काही जण 52 पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता आरोपी पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले.
या कारवाईत शरद दत्तात्रय येडवे, द-याप्पा मोहन गोडसे, बाबासो अशोक नरळे, चंद्रशेखर पांडुरंग गोडसे, संग्राम सिध्देश्वर गोडसे, समाधान काशिनाथ ऐवळे, निवास भारत ऐवळे, सोमनाथ हरी गोडसे (सर्व रा. लक्ष्मीनगर, ता. सांगोला) तसेच अनिल महादेव चव्हाण (रा. जाधववाडी, चिकमहुद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून 4 हजार 500 रुपयांची रोख रक्कम, 52 पत्त्यांचा जुगार कॅट, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन तसेच अनेक मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये हिरो एचएफ डिलक्स, होंडा युनिकॉर्न, स्प्लेंडर आदी दुचाकींचा समावेश असून एकूण मुद्देमालाची किंमत 4 लाख 34 हजार 500 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोना/835 लेंगरे हे करीत आहेत. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
