सांगोला/प्रतिनीधी
डॉ. सुधीर गवळी यांनी सांगितले की, भारत सरकारच्या वतीने देशभरात राबविण्यात येणार्या जनगणना 2027 या राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ 16 मे 2026 पासून होत असून, पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सांगोला शहरातील सर्व नागरिकांनी या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रगणकांना अचूक माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जनगणना प्रक्रियेदरम्यान प्रत्येक कुटुंबाची, घराची तसेच उपलब्ध सुविधांची संपूर्ण व सत्य माहिती नोंदवली जाणार आहे. यासाठी नागरिकांनी आपल्या घरी येणार्या प्रगणकांना स्पष्ट व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे. प्रगणकांकडे शासकीय ओळखपत्र असणार असून, नागरिकांनी खात्री करूनच माहिती द्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जनगणनेसाठी गोळा करण्यात येणारी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. या माहितीचा वापर केवळ सांख्यिकीय आणि शासकीय नियोजनासाठी केला जात असल्याने नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी जनगणनेत विचारल्या जाणार्या 34 प्रश्नांची उत्तरे देणे नागरिकांसाठी बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वगणना पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना प्राप्त झालेला डए आयडी क्रमांक घर भेटीस येणार्या प्रगणकांना द्यावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
खोटी माहिती दिल्यास कारवाईची तरतूद
जनगणना कायदा 1948 नुसार जनगणना अधिकार्यांना चुकीची माहिती देणे, माहिती देण्यास नकार देणे किंवा टाळाटाळ करणे हा कायद्याने दंडनीय प्रकार मानला जातो. त्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती देणे हे कायदेशीर बंधन असून, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
