खा.वाघमारे यांच्या हस्ते सोमवारी वितरण !
सांगोला प्रतिनिधी:
सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत मानाचे व प्रतिष्ठित मानल्या जाणार्या शैक्षणिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून दि. 13 एप्रिल रोजी मंगळवेढा येथे या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देणार्या शाळा व शिक्षकांसाठी स्व. आप्पा खंडू भगरे सामाजिक ट्रस्टच्या सहयोगाने 2001 पासून ही पुरस्कार योजना राबविण्यात येते. यंदाचा 24 वा शैक्षणिक पुरस्कार प्रदान सोहळा सोमवार दि. 13 एप्रिल रोजी दु. 3 वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते संपन्न होणार असून या सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे हे भुषविणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, शिक्षण समिती सभापती चेतनसिंह केदार, शिक्षक समितीचे राज्यनेते उदयराव शिंदे, इचलकरंजी म.न.पा.आयुक्त पल्लवी भोरे- पाटील, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार दत्तात्रय सावंत, धनश्री परिवाराचे सदस्य प्रा. शिवाजीराव काळुंगे, शिक्षणाधिकारी कादर शेख , प्रा.वनमाला भगरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातून पुरस्कारासाठी निवडी करण्यात आल्या आहेत. यंदाच्या कृतीनिष्ठ शिक्षक पुरस्कारासाठी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन नंदकिशोर गायकवाड, संजय जवंजाळ, रोहिणी चौधरी, नवनाथ सावत, नवनाथ कोडग, राजकुमार कुलकर्णी यांची खाजगी व माध्यमिक शिक्षक गटातून निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत ज्योती कलुबर्मे, धनाजी देशमुख, बालाजी जाधव, अर्चना फुलारी, मंगेश पाटील, प्रफुल्लता सातपुते, स्मिता शिंदे, अनिल भगत, आण्णासाहेब सुरवसे, ईराप्पा अनगिरे, कांचन भेंडे, मिनाक्षी म्हेत्रे इत्यादी शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय संस्थेच्या वतीने स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कारासाठी शाळेचे अंतरंग, बाह्यांग, वर्गसजावट, शैक्षणिक गुणवत्ता इत्यादी निकष पूर्ण करणार्या जिल्ह्यातील अकरा शाळांची तर उत्कृष्ट वृक्ष लागवड व संवर्धन करणार्या सहा शाळांची वृक्षमित्र शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व पुरस्कार प्राप्त शाळा व शिक्षकांचा सन्मानचिन्ह, मानपत्र, फेटा, शाल व बुके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.शैक्षणिक क्षेत्रातील चांगुलपणाला प्रोत्साहन देणार्या या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन छत्रपती परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो मरवडे फेस्टिवल
