माढा, प्रतिनिधी :
माढा लोकसभा मतदारसंघातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लोकसभेत जोरदार आवाज उठवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत चालल्याचे सांगत त्यांनी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
लोकसभेतील चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक ठिकाणी ही कामे अद्याप अपूर्ण असून, ती नेमकी कधी पूर्ण होणार याबाबत स्पष्टता नसल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे भीषण वास्तव मांडताना त्यांनी सांगितले की, अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे. भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे शेतीवर तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहेत.
तात्पुरत्या उपायांवर अवलंबून राहण्याऐवजी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याचे अधोरेखित करत त्यांनी जलसंधारण व भूजल पुनर्भरणासाठी माढा मतदारसंघाला विशेष आर्थिक पॅकेज देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली.
यासोबतच भविष्यातील दुष्काळ टाळण्यासाठी केंद्र सरकारचा नेमका कृती आराखडा काय आहे, तसेच टंचाईग्रस्त भागांना प्राधान्य कधी दिले जाणार, याबाबतही त्यांनी सभागृहात सवाल उपस्थित केले. माढा मतदारसंघातील नागरिकांना पाणीटंचाईतून दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
