जिल्हाधिकार्यांनी घेतली तक्रारीची दखल
सांगोला प्रतिनिधी :
सांगोला नगरपालिकेच्या विद्युत विभागात झालेल्या कथित भ्रष्टाचाराला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्युत अभियंत्यांनी केलेल्या गैरव्यवहाराची गंभीर दखल जिल्हाधिकार्यांनी घेतली असून, सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
विद्युत अभियंत्याने हम करे सो कायदा या पद्धतीने कामकाज सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रत्येक कामात अनावश्यक अडथळे निर्माण करून नियमांचे कारण पुढे केले जात असल्याची तक्रार नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. सांगोला नगरपालिकेच्या इतिहासात विद्युत विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती. मात्र, गेल्या दोन वर्षांत प्रशासकांच्या कार्यकाळात विद्युत अभियंत्यांनी बेकायदेशीर कामे करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक वाटाघाटी केल्याचा आरोप आहे.
अंदाजपत्रकानुसार एकही काम पूर्ण करण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. प्रशासकीय कारभार असल्यामुळे यापूर्वी या प्रकरणाची चौकशी झाली नव्हती. मात्र, नूतन कर्तव्यदक्ष जिल्हाधिकार्यांकडे दाखल झालेल्या तक्रार अर्जानंतर त्यांनी तत्काळ दखल घेत, सर्व कामांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत.
यामध्ये ‘ पोल उभारणी’च्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, लाईट विभागासाठी करण्यात आलेल्या साहित्य खरेदीत मोठी तफावत असल्याचेही समोर आले असून, त्याचीही चौकशी होणार आहे.
माझे कोणी काही करू शकत नाही, अशा अविर्भावात वावरणार्या संबंधित अभियंत्याने नियमांचा आधार घेत सर्वांची दिशाभूल केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या प्रकरणी अनेक नगरसेवकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.
जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे, सांगोला नगरपालिकेच्या विद्युत विभागातील भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
