सांगोला / प्रतिनिधी -
सांगोला नगरपरिषदेकडून थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, भाजी मंडई परिसरातील एका गाळ्यावर सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे. दोन वर्षांपासून थकीत असलेली रक्कम न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याने शहरातील इतर गाळेधारकांमध्येही खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरक्षण क्रमांक 23 भाजी मंडई लगत गाळा क्रमांक 7 मधील गाळेधारक सत्तार इ. आतार यांनी नगरपरिषदेची तब्बल 54,571 रुपयांची थकबाकी दीर्घकाळ प्रलंबित ठेवली होती. वारंवार नोटीस देऊनही संबंधितांनी भरणा न केल्याने अखेर नगरपरिषद प्रशासनाने कठोर भूमिका घेत गाळा सील करण्याचा निर्णय घेतला.
माननीय मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या आदेशानुसार प्रशासकीय अधिकारी सचिन दगडू पाडे यांच्या नेतृत्वाखाली वसुली पथकाने ही कारवाई केली. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कारवाईदरम्यान गाळा सील करण्यात आला असून, थकबाकी वसुलीसाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील इतर ज्या गाळेधारकांकडे कर व भाड्याची थकबाकी आहे, त्यांनी तात्काळ भरणा करावा. अन्यथा अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या कारवाईमुळे नगरपरिषदेच्या वसुली मोहिमेला गती मिळाली असून, अनेक थकबाकीदारांनी आता स्वखुशीने भरणा करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे समोर येत आहे. नगरपरिषदेकडून नियमितपणे वसुली मोहिम राबवून शहरातील महसूल वाढवण्यावर भर दिला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, नागरिकांनीही नगरपरिषदेच्या या कारवाईचे स्वागत करत नियमांचे पालन सर्वांनीच करावे, यासाठी अशा प्रकारच्या कारवाया आवश्यक आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
