सांगोला / प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाला सांगोला तालुक्यातील तलाठी संघटनेने सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. दि. 21 एप्रिल 2026 पासून सुरू होणार्या या संपात सांगोला तालुक्यातील सर्व ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकारी सहभागी होणार असल्याची अधिकृत माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
सांगोला तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष हरिचंद्र अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस गणेश बाळासाहेब भुजबळ यांनी तहसीलदार, सांगोला यांना यासंदर्भात लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा न निघाल्यामुळे बेमुदत संप पुकारल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्राममहसूल अधिकारी संघटना ही राज्य सरकारी कर्मचारी संघटनेशी संलग्न असल्याने सांगोला तालुक्यातील तलाठी संघटनाही या संपात सहभागी होत आहे. त्यामुळे महसूल विभागातील दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या संपामुळे उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, फेरफार नोंदी, 7/12 उतारे आदी महसुली कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता असून नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते.
संघटनेच्या पदाधिकार्यांमध्ये कार्याध्यक्ष नाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष दिनेश सोनुने, अर्चना लोखंडे, सहसचिव नारायण खरात, तसेच इतर सदस्यांचा समावेश असून सर्वांनी एकमताने संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. जेथे एकता तेथे सुरक्षितता हा संदेश देत तलाठी संघटनेने आपल्या हक्कांसाठी लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
