* वाढेगाव, जांगळेवस्ती, कोपटेवस्ती परिसरातील नदीपात्रालगतचे रस्ते केले बंद
सांगोला/ प्रतिनिधी:
सांगोला तालुक्यातील नदीपात्रातील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे नदीपात्रातून वाळूची छुपी चोरटी वाहतूक सुरू होती. याबाबत नदी काठावरील गावातील ग्रामस्थांच्या व पर्यावरण प्रेमींच्या वाळू चोरी संदर्भातील तक्रारींची दखल घेत सांगोलच्या तहसीलदार श्रीमती बाळुताई भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार महसूल प्रशासनाने वाळू चोरी रोखण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. नदीपात्रामध्ये जाणारे अनेक छुपे मार्ग महसूल प्रशासनाने रस्त्यावर चार्या खोदून रोखले आहेत . त्यामुळे चोरटी वाहतूक करणार्या वाळू माफियांचे वाळू चोरीचे मार्ग अडवल्याने वाळू चोरीस आळा बसणार आहे. पर्यायाने महसूल प्रशासनाच्या या उपायामुळे नदीपात्रातील वाळू सुरक्षित राहण्यास मदत होईल व पर्यावरणाचे संरक्षण होईल अशी चर्चा जनमानसातून व निसर्गप्रेमीमधून समोर येत आहे. सांगोला माणनदी पात्रातील वाढेगाव जांगळेवस्ती, कोपटेवस्ती या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.
नदीपात्रातील वाळू म्हणजे सोन्याच्या किंमतीचा गौणखनिज ऐवज आहे. या नदीपात्रातील सोन्याचे जतन केले तरच खर्या अर्थाने शेतकर्याची शेती समृद्ध होईल व पाण्याचे साठे व भूगर्भातील पाणी पातळीचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या या उपायाने जनतेतून कौतुक होत आहे. महसूल प्रशासनाने यापुढेही मोठ्या प्रमाणात वाळू चोरीवर आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. या मागणीवर महसूल प्रशासनही कारवाई करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही अशी माहिती सांगोला मंडल अधिकारी महेश जाधव यांनी दिली आहे.
