पहिल्या व्यवस्थापकीय संचालकांचाही यथोचित सन्मान करण्याचाही मागणी
जवळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची स्थापना दि. 31 जुलै 1946 रोजी झाली आहे. ही स्थापना स्वर्गीय बाबासाहेब आबाजी पाटील यांनी केली होती आणि त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून व आठवण म्हणून या संस्थेत स्वर्गीय बाबासाहेब आबाजी पाटील असे नामकरण करावे अशी मागणी प्रफुल्ल कदम सह जवळा ग्रामस्थांनी केली आहे. जवळा विविध कार्यकारी सोसायटीची स्थापना स्वर्गीय बाबासाहेब आबाजी पाटील, अण्णासाहेब तात्यासाहेब घुले, आप्पासाहेब बळवंतराव पाटील, एकनाथ भाऊ साळुंखे, गुरुलिंग महादू चौगुले, रामचंद्र बापू साळुंखे या मंडळींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये करून त्यास वैभवास आणले आहे. त्यावेळी केवळ 84 सभासद व केवळ 2515 रुपये शेअर भांडवला वर ही संस्था उभी करून त्यांनी केवळ जवळे गाव व चार वाड्यामध्येच नव्हे तर आसपासच्या 10 गावांमध्ये सेवा केलेली आहे. या संस्थेमार्फत त्यांनी जवळा पंचक्रोशी सह सोनंद, कडलास या आसपासच्या 10 गावांमध्ये त्याकाळी रॉकेल डाळी, गूळ शेतकर्यापर्यंत वितरित करण्याचे कार्य केले आहे. एवढेच नव्हे तर दहा गावांमध्ये कापड सुद्धा वितरित करण्याची कार्य यशस्वीपणे पार पडले आहे. त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा पंढरपूरला असतानाही खडतर प्रयत्नातून ’ब’ वर्ग दर्जा प्राप्त करून जिल्ह्यातील विशेष सन्मान मिळवला होता. या संस्थेने जवळे सह आसपासच्या गावातील शेतकर्यांना मोठा आर्थिक आधार दिलेला आहे. या व्यवस्थापकीय मंडळातील लोकांमुळे जवळे गावाला वेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यापारी, राजकीय सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या काळाचा विचार करता हे कार्य खूप महत्त्वाचे पायाभूत स्वरूपाचे होते. या संस्थेचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय बाबासाहेब आबाजी पाटील हे स्वतः धारवाड (कर्नाटक) येथे जाऊन शिक्षण घेतल्यामुळे ते त्याकाळी उत्तम पद्धतीचे इंग्रजी बोलू व लिहू शकत होते. त्यांनी पुढाकार घेऊन या संस्थेचा सर्व मान्यता व कारभार अत्यंत प्रामाणिकपणे व स्वच्छतेने पार पडला. त्यांना त्यावेळी स्वर्गीय अण्णासाहेब घुले, सचिव आप्पासाहेब बळवंतराव पाटील व इतर संचालकांनी अत्यंत मोलाची साथ दिली.या सर्वांनी मिळून राजकारण विरहित आणि स्वार्थ बाजूला ठेवून या संस्थेची उभारणी केली. या संस्थेला आज तब्बल 80 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे तथापि या सर्व पायाभूत कार्य करणार्या मंडळीची कोणतीही आठवण व माहिती या संस्थेला, आसपासच्या गावांना आणि येणार्या पिढींना नाही हे अत्यंत दुर्दैवी आणि कृतघ्नपणाचे आहे. तेव्हा जवळे विविध कार्यकारी सोसायटी या सहकारी संस्थेस संस्थापक चेअरमन स्वर्गीय बाबासाहेब आबाजी पाटील असे नामकरण करून पहिल्या व्यवस्थापकीय मंडळामध्ये असणार्या सर्व संचालक मंडळाचे फोटो सोसायटीच्या कार्यालयात लावून त्यांच्या कार्याचा आणि स्मृतीचा यथोचित सन्मान करावा अशी लेखी मागणी प्रफुल्ल कदम सह जवळे व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
