Breaking

Friday, 20 March 2026

आपला शब्द खरा करा जयाभाऊ!



हॉस्टेल उभारल्यास तमाम मावळ्यांच्या मुली तुम्हाला आशीर्वाद देतील - राजा माने


सोलापूर - 

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवलेल्या मराठा नगरसेवकांचा गौरव आणि समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सोलापूर जिल्हा सकल मराठा ट्रस्टच्या वतीने एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना ट्रस्टचे विश्वस्त राजा माने यांनी पालकमंत्री ना. जयाभाऊ गोरे यांना मुलींच्या वसतिगृहाचा शब्द पूर्ण करण्याचे भावनिक आवाहन केले.


​ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री ना. जयाभाऊ गोरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने महापौर विनायक कोंड्याल, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य शहाजीभाऊ पवार. जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजितभाऊ पवार, उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, दिलीपभाऊ कोल्हे, चंद्रकांतदादा वानकर, राजनभाऊ जाधव आदी मान्यवर उपस्थित होत्र.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना राजा माने यांनी पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, "पालकमंत्री जयाभाऊंनी प्रस्तावित मुलींच्या हॉस्टेलच्या जागेबद्दल ठोस शब्द दिला आहे. अगदी वेळ पडल्यास कायदा बदलण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली आहे. आता ही वेळ कृतीची आहे."


​"जयाभाऊ, आता लवकरच आपला शब्द खरा करा! सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या तमाम मावळ्यांच्या मुलींना शिक्षणासाठी हक्काचे छप्पर मिळाल्यास, त्या तुम्हाला आयुष्यभर आशीर्वाद देतील" असे प्रतिपादन जेष्ठ संपादक तथा सोलापूर जिल्हा सकल मराठा ट्रस्ट चे विश्वस्त राजा माने यांनी केले आहे. 


​या सोहळ्याच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज पुन्हा एकदा संघटित झाल्याचे पाहायला मिळाले. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी समाजाच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. आता सर्वांचे लक्ष पालकमंत्री जयाभाऊ गोरे हे हॉस्टेलच्या जागेचा प्रश्न किती लवकर मार्गी लावतात, याकडे लागले आहे.