Breaking

Monday, 23 March 2026

ठोंबरे परिवारातर्फे नवनिर्वाचित नगरसेविका वैशाली सावंत व वैशाली झपके यांचा स्नेहपूर्ण सत्कार*




सांगोला: प्रतिनिधी




सांगोला नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेविका सौ. वैशाली सतीश सावंत आणि सौ. वैशाली बाळासाहेब झपके यांचा ठोंबरे परिवाराच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. राजकीय धामधूम आणि विविध निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेला हा कौटुंबिक सत्कार सोहळा अत्यंत जिव्हाळ्याच्या वातावरणात पार पडला.

डिसेंबरमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे वाहत होते. तसेच गावोगावी होणारे मोठे सत्कार सोहळे यामुळे हा घरगुती सत्कार काहीसा लांबणीवर पडला होता. अखेर ठोंबरे परिवाराने या दोन्ही यशस्वी महिला लोकप्रतिनिधींचा सन्मान करून जुन्या ऋणानुबंधांना उजाळा दिला.

*पुस्तके देऊन वैचारिक सन्मान*

या सोहळ्यात नगरसेविका वैशाली झपके व वैशाली सावंत यांचा सत्कार सौ. मनिषा ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला. याच प्रसंगी डिजिटल मीडियाचे प्रांतिक अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सतीश सावंत आणि ज्येष्ठ उद्योगपती बाळासाहेब झपके यांचा सत्कार प्रा. राजेंद्र ठोंबरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुस्तक भेट देऊन करण्यात आला.

विशेष म्हणजे, दोन्ही परिवारांना यावेळी ‘भावगंध’ आणि ‘विद्यामंदिरचे पुजारी’ ही पुस्तके भेट देण्यात आली. निव्वळ हार-तुरे न देता पुस्तके देऊन करण्यात आलेल्या या वैचारिक सत्काराचे उपस्थितांकडून कौतुक होत आहे.

*जुन्या आठवणींना उजाळा*

झपके, सावंत आणि ठोंबरे या तिन्ही कुटुंबांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्नेहबंध आहेत. या सत्कार प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. बाळासाहेब झपके आणि सतीश सावंत यांच्या कुटुंबात सलग दुसर्‍यांदा नगरसेवक पद मिळाले आहे, याबद्दल ठोंबरे परिवाराने त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी पुष्पा शिंदे, प्रताप शिंदे, स्वाती येणपे, संकेत ठोंबरे उपस्थित होते..