सांगोला / प्रतिनिधी :
सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर आरोपांची छाया पडली असून, बँकेचा बोजा (कर्ज तारण) असलेल्या मालमत्तांवरही दस्त नोंदणी केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. या कथित प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही प्रकरणांमध्ये संबंधित मालमत्तांवर बँकेचा कब्जा किंवा कर्जाचा बोजा असतानाही व्यवहारांना परवानगी देण्यात येत असल्याचा आरोप आहे. नियमांनुसार अशा व्यवहारांसाठी बँकेची लेखी परवानगी (छजउ) आवश्यक असते. मात्र, या प्रक्रियेचे पालन न करता दस्त नोंदणी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या कथित प्रकारामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बोजा असलेल्या मालमत्तांची खरेदी करणार्या नागरिकांना पुढे बँकांकडून कारवाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत नियमांचे उल्लंघन करून व्यवहार होत असतील तर याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, सांगोला येथील आजी-माजी आमदारांनी तसेच संबंधित वरिष्ठ प्रशासनाने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयातील हा कथित मनमानी कारभार नेमका कधी थांबणार? आणि याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी कधी गांभीर्याने लक्ष देणार? या प्रश्नांची उत्तरे आता नागरिकांना अपेक्षित आहेत.
